मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासह (Election Commission) पोलीस (Police) यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणुकीला सुरुवात होण्याआधी निवडणूक आयोगाने 4650 कोटी रुपये जप्त केले आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक 18 वी लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून तपास यंत्रणांचीही यावर करडी नजर आहे.


लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई


निवडणूक आयोगाने (EC) सोमवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेली छापेमारी आणि जप्ती कारवाईची माहिती दिली आहे. 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान तब्बल 4,650 कोटी जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्ज, दारू आणि मौल्यवान धातू यासारख्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. 2019 च्या निवडणूक प्रचारादरम्यान 3475 कोटी जप्त करण्यात आले होते यापेक्षा हे प्रमाण 34 टक्क्यांनी वाढलं आहे.


निवडणूक आयोग अलर्ट मोडवर


निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यानच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेली रक्कम इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. अजूनही आयोगाची कारवाई सुरुच आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4650 कोटी जप्त


2024 च्या निवडणुकीतील जप्ती ही लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक आहे, असं निवडणूक आयोगाने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. ही जप्ती 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या 3,475 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. निवडणूक आयोगाने माहिती देताना सांगितलं की, यावर्षी 1 मार्चपासून दररोज सुमारे 100 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.


151 कोटींहून अधिक किमतीची दारू जप्त


दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आणि कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून तपास आणि छापेमारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने 45.59 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 151 कोटी रुपयांहून अधिक किमतीची दारूही जप्त केली आहे. व्यापक नियोजन, सहकार्य, सक्रिय नागरिकांचा सहभाग आणि तंत्रज्ञानामुळे ही जप्ती शक्य झाल्याची माहिती आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाने निवेदनात सांगितलं आहे की, 16 मार्चला आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून, कर्नाटकात जप्तीशी संबंधित 1,650 एफआयआर नोंदवण्यात आले असून एकूण 345.89 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


रोख रक्कम आणि कोट्ववधींची रोकड जप्त


निवडणूक आयोगाने सोमवारी माहिती देत सांगितलं की, लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांनी रोख, मद्य, ड्रग्ज आणि चार कोटींहून अधिक किमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासात नोंदवलेल्या प्रलोभनांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक जप्ती यंदा सर्वात जास्त आहेत. एकूण 4650 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली असून 2019 च्या तुलनेत यामध्ये 175 कोटींची वाढ झाल्याचंही सांगितलं आहे.