Latur News: प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका नर्स महिलेने आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. पेठ गावच्या शिवारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन दराडे आणि राणी दराडे (दोघेही राहणार दरडवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड) अशी मृतांची नावे आहेत. (crime news)

Continues below advertisement

प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध

प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका नर्स आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. “कायमचं एकत्र राहण्यासाठी” या जोडप्याने घेतलेलं टोकाचं पाऊल आता सर्वांना हादरवून सोडलंय. पत्र्याच्या एका खोलीत एका बाजूला तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवले तर त्याच खोलीत नर्स तरुणीनेही गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन दराडे हा शारीरिकदृष्ट्या अपंग असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. तो अहमदपूर येथे राहून अभ्यास करत होता. दुसरीकडे, राणी दराडे ही व्यवसायाने नर्स असून ती लातूर येथील खासगी रुग्णालयात कार्यरत होती. दोघेही भावकीतील असल्याने आधीपासून दोघांची ओळख होती. ओळखीचं रुपांतर  प्रेमात झालं . मात्र, दोघांच्या  प्रेमसंबंधांना दोन्ही  कुटुंबीयांनी विरोध दर्शवला. घरच्यांच्या या विरोधामुळे मानसिक ताण आलेल्या या जोडप्याने टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Continues below advertisement

पेठ गावच्या शिवारात सापडले मृतदेह

दोघांचे मृतदेह लातूर जिल्ह्यातील पेठ गावच्या शिवारात सापडले. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टेमसाठी) लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

या घटनेमुळे दरडवाडी गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडालीय.दोघेही शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणारे तरुण होते. मात्र दोघांनीही असं पाऊल उचलल्याने गावात या घटनेची एकच चर्चा आहे. नितीनच्या अपंगत्वावर मात करून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, तर राणीने वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. पण समाजातील दडपण आणि घरच्यांच्या विरोधामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने गावकऱ्यांसह कुटुंबीय सुन्न झाले आहेत.