UP Two Minor Sisters Found Dead : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर (Lakhimpur) येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळले आहेत. या दोन्ही मुलींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. निघासन कोतवाली येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दोन्ही मुलींचं पोस्टमार्टम करण्यात येईल, त्यानंतर याबाबत अधिक माहिती देता येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच मुलींच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. त्यांच्यातडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यात येईल आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 


अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लखनौ जिल्हा दंडाधिकारी महेंद्र बहादूर सिंह यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन मुलींच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात येईल. गुरुवारी 15 सप्टेंबर रोजी मुलींच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येईल. 


विरोधकांचा सरकारवर जोरदार निशाणा


दरम्यान, या प्रकरणावरून लखीमपूरमध्ये वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधकांनी योगी सरकारला निशाण्यावर धरलं आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''निघासन पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन दलित बहिणींचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. तर पीडित मुलींच्यी वडीलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत की, पंचनामा आणि कुटुंबियांच्या सहमतीशिवाय मृतदेहांचं पोस्टमार्टम करण्यात आलं. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या 'हाथरस'मधील घटनेची पुनरावृत्ती आहे.''






काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचंही ट्विट


काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी या प्रकरणावर ट्विट करत म्हटलं आहे की, "उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं होतं. वृत्तपत्रे आणि टीव्हीवर दररोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा आणि सुव्यवस्था चांगली होत नाही. उत्तर प्रदेशामध्ये महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? सरकारला कधी जाग येणार?"