Kurla Bus Accident: ज्या रुग्णालयात नोकरीला, त्याच्यासमोरच अपघात; मुलाचं लग्न बघण्यापूर्वीच आईने डोळे मिटले, सर्व गहिवरले!
Kurla Best Bus Accident: कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत.
Kurla Best Bus Accident मुंबई: मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात काल (9 डिसेंबर) रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात (Kurla Best Bus Accident) झाला होता. या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत.
बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली. या अपघातात अनेकजण चिरडले गेले. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कुर्ला येथील अपघातात 55 वर्षीय कणीस फातिमा अंसारी यांचा ही मृत्यू झाला. ते जिथे अपघात झाला त्या रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयमध्ये काम करीत होत्या. काल त्या कामावर जात असताना रुग्णालयाच्या समोरच हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. घरात मुलाचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र हा अपघात झाला आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना दोन मुली दोन मुले आहेत.
20 वर्षीय अनम शेखचाही मृत्यू, कुटुंबिय काय म्हणाले?
कुर्ला येथील बस अपघातामध्ये 20 वर्षीय अनम तिच्या कामा निमित्त सीएसएमटीला गेली होती. घरी परतताना कुर्ला स्थानकावर गर्दी आणि रिक्षा मिळत नसल्याने तिने वडिलांना बोलावले होते. दोघेही दुचाकीने घरी परतत असताना हाअपघात घडला. या दुर्घटनेत अनम हिचा मृत्यू झाला असून वडील मुजफर शेख हेही गंभीर जखमी झाली आहेत. दरम्यान आपल्या मुलीच्या मृत्यूची कल्पनाही त्यांना अद्याप नाही. सरकारने आम्हाला 5 लाखांची मदत केली मात्र या 5 लाखात आमची गेलेली मुलगी ही परत मिळणार नाही. माझी विनंती आहे प्रशासनाला त्या मार्गावर अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना उठवा ज्याने करून अन्य मुलांसोबत अशी दुर्घटना घडणार नाही अशी प्रतिक्रिया मृत अनमचे मामा अजगर यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.