कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरसह परिसरात सुरू असलेल्या अंधश्रद्धेचे प्रकार आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील दिसू लागले आहेत. करवीर तालुक्यातील वडकशिवाले गावातल्या स्मशानभूमीत कोल्हापूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह प्राचार्य आणि चालकांच्या फोटोवर हळद कुंकू आणि काळ्या बाहुल्या टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वडकशिवाले गावासह संबंधित शिक्षण संस्थेत देखील खळबळ उडाली आहे.
शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात सुरू असलेल्या अंतर्गत वादातून हा प्रकार केला केला असावा असा संशय आता व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करावा आणि कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
कुंकू लावलेले फोटो अन् काळ्या बाहुल्या
कोल्हापूर शहर आणि परिसरात भानामतीच्या घटना ताज्या असतानाच आता हे लोन कोल्हापूरच्या ग्रामीण भागात देखील पोहोचल्याच दिसत आहे. करवीर तालुक्यातील वडकशिवाले गावच्या स्मशानभूमीत कोल्हापुरातील प्रिन्स मराठा शिवाजी बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या अध्यक्षासह संचालकांचे कुंकू लावलेल्या अवस्थेतील फोटो आढळून आले आहेत. इतकंच नाही तर या फोटो शेजारी काळ्या बाहुल्या, लिंबू आणि टाचण्या देखील असल्याचं दिसून आलं.
Vadakshivale Cemetery Black Magic : वडकशिवाले गावामध्ये खळबळ
शिक्षण संस्था कोल्हापूरमध्ये आणि या संस्थेशी निगडित व्यक्तींच्या भानामतीचा प्रकार वडकशिवाले गावामध्ये झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांचे फोटो शिक्षण संस्थेशी संबंधित व्यक्ती शिवाय अन्य कोणाला सहजासहजी मिळणे शक्य नाही. त्यामुळे संस्थेतीलच कोणीतरी हा भानामतीचा प्रकार केल्याचा संशय बळावला आहे.
प्रिन्स मराठा शिवाजी बोर्डिंग हाऊस संस्थेमध्ये गेल्या काही दिवसापासून नोकर भरती आणि पदोन्नती वरून वाद सुरू आहे. त्या अंतर्गत वादातून हा प्रकार केला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Kolhapur Bhanamati News : दोषींवर कडक कारवाई करणार
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस अध्यक्षांसह संचालक मंडळाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामागे जर संस्थेशी संबंधित कोणाचा हात असल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा संस्थेकडून देण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: