Ketan Agrawal Case: पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याचा अपघात झाला नसून, त्याची हत्या (Murder) करण्यात आली आहे, ही शंका ज्या व्यक्तीला सगळ्यात आधी आली होती, ती केतनची बहीण संजना अग्रवाल अखेर प्रसारमाध्यमांसमोर आली आहे. भावाच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्याच्या अत्यंत वेदनादायी क्षणी अग्रवाल कुटुंबाने पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तिथे बाप्पाकडे साकडे घातल्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या भयंकर परिस्थितीचा पाढाच वाचला.
सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत पडून केतनचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव आरोपींनी रचला होता. मात्र, केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांच्यावर सगळ्यात आधी संशय घेतला तो बहीण संजनाने. संजनाने व्यक्त केलेल्या याच तीव्र संशयामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा फिरवली. पोलिसांच्या सखोल चौकशीत अखेर हा अपघाताचा बनाव उघड झाला आणि या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Ketan Agrawal Case: काय म्हणाली केतनची बहीण?
बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर अत्यंत भावुक अवस्थेत संजनाने आपल्या मनातील वेदना बोलून दाखवल्या. ती म्हणाली, "आज माझ्या भावाला जाऊन पूर्ण एक महिना झाला आहे. या एका महिन्यात मी त्याचा चेहरा पाहिलेला नाही, ना त्याचा आवाज ऐकला. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी दुहेरी वेदना देणारा आहे. कारण, आज आमचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचा वाढदिवस आहे. पण, लाडक्या केतनच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने आजोबांचेही काही दिवसांपूर्वीच खचून जाऊन निधन झाले. घरात जिथे वाढदिवसाचा आनंद असायला हवा होता, तिथे आज फक्त केतनच्या आठवणी आणि स्मशानशांतता पसरली आहे."
कुटुंबाची मनःस्थिती मांडताना संजना पुढे म्हणाली की, "आमचा परिवार आता यापुढे कोणतेही दुःख झेलू शकत नाही. आता आम्हाला फक्त आणि फक्त न्यायालयाच्या लढाईवर विश्वास आहे. कायदेशीर प्रक्रियेद्वारे या प्रकरणात निष्पक्ष व जलद निकाल लागेल आणि माझ्या निष्पाप भावाला लवकरात लवकर न्याय मिळेल, याच अपेक्षेने आम्ही बाप्पाकडे प्रार्थना केली आहे." अशा शब्दांत संजनाने आपली आर्त हाक मांडली.
Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल प्रकरणाला एक महिना पूर्ण
दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला 18 जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला असून पोलिसांचा सखोल तपास अजूनही सुरू आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघे गुन्ह्याचा कट रचताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'सांकेतिक भाषेचा' वापर करायचे, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी व्हॉट्सॲपवरील जे चॅट्स डिलीट केले होते, ते पुन्हा रिकव्हर करण्यासाठी पोलीस आता सायबर तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेत आहेत. या प्रकरणात आता आणखी काय घडामोडी समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
