ठाणे : कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना भर रस्त्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांनी चोप दिला. आपल्या छातीला हात का लावला? शिव्या का दिल्या? असं म्हणत राणी कपोते यांनी मोहन उगले यांना भर रस्त्यावरच चोप दिल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे.
मोहन उगले हे शिंदे गटाचे माजी नगरसेवक असून राणी कपोते यांच्याशी काही दिवसांपासून वाद आहे. रविवारी कल्याण पश्चिमेतील एका रस्त्याच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद निर्माण झाला होता. या वादावरून पुन्हा वाद पेटला आणि त्याचाच बदला म्हणून मोहन उगले यांना भर रस्त्यात राणी कपोते यांनी चोप दिला असल्याची चर्चा आहे.
आपल्या छातीला हात का लावला?
आपल्या छातीला हात का लावला असं म्हणत राणी कपोते यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना चांगलाच चोप दिल्याचं दिसतंय. भर रस्त्यावर त्यांनी मोहन उगले यांना अनेकदा मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. तसेच आपल्याला शिवीगाळ का केली असं म्हणतही त्यांनी मोहन उगले यांना मारहाण केल्याचं दिसतंय.
चुकीचा आरोप करत एक महिला आपल्याला कशी मारहाण करते हे सगळ्या लोकांनी पाहावं असं यावेळी मोहन उगले म्हणताना दिसत आहेत. अशातही राणी कपोते या त्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
रस्त्याच्या कामावरून श्रेयवाद
माजी नगरसेवक मोहन उगले आणि शिवसेना पदाधिकारी राणी कपोते यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे. रविवारी कल्याण पश्चिमेतील एका रस्त्याच्या भूमिपूजनावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रस्त्यासाठी आपण खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदारांकडून निधी आणल्याचा दावा राणी कपोते करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पदाधिकारी आणि मोहन उगले हे या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपत आहेत. समोर सुरू असलेल्या या प्रकारामुळे राणी कपोते अधिकच संतापल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
याच गोष्टीचा राग मनात ठेऊन राणी कपोते यांनी मोहन उगले यांना भर रस्त्यावर मारहाण केल्याची चर्चा आहे. पण मोहन उगले यांनी आपल्या अंगाला हात लावले, छातीला हात लावत असल्याचा आरोप करत, शिवीगाळ केल्याचा आरोप राणी कपोते यांनी केला आहे.
ही बातमी वाचा: