Kalyan news update :  चित्रपटात दाखवलेल्या क्रूर लालची सावकाराला लाजवेल अशी घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.  दोन, पाच, दहा टक्के नव्हे तर दरमहा तब्बल 25 टक्के व्याज आणि महिना संपल्यानंतर दिवसाला आठशे रुपये दंड उकळणाऱ्या एका कथित सावकाराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गजाआड केल आहे. दर्पण मंडाळे असं या कथीत सावकराचं नाव असून त्याच्यासह  त्याची पत्नी, बहीण, आई यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात राहणाऱ्या सुशांत मोहिते या तरुणाला काही पैशाची गरज होती. लगेच पैसे पाहिजे असल्याने त्याने काही मित्रांकडे पैशासाठी विचारणा केली. एका मित्राने सुशांत याला व्याजाने पैसे देणाऱ्या दर्पण मंडाले याची ओळख करून दिली. सुशांत याने  दर्पणकडून प्रथम 50 हजार रुपये दरमहा 25 टक्के व्याजाने घेतले. हे पैसे व्याजासह परत केल्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी 1 लाख रुपये दरमहा 25 तक्के  व्याजाने घेतले. काही महिन्यांचं व्याज थकल्याने दर्पण याने पैशासाठी सुशांतकडे तगादा लावला. 


साकाराच्या तगाद्याने काही महिन्यात सुशांत याने व्याजासह दर्पणला तीन लाख 54 हजार 500 रुपये परत केले. परंतु, इतके सगळे करुन देखील दर्पण आणि त्याचे साथीदार व्याजाच्या रक्कमेत काही पैसे बाकी आहेत. व्याज देण्यात उशिर झाल्याने दंडात्मक कारवाई म्हणून बाकी असलेले पैसे असे मिळून आणखीन चार लाख रुपयांची मागणी करत होते. सर्व पैसे देऊन देखील आता आणखीन पैसे कुठून आणू अशी सुशांत याने विनंती केली. मात्र दर्पण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 


दर्पण, त्याची आई विजया, बहिण विशाखा , पत्नी मनिषा यांनी सुशांत याच्या घरी जावून गोंधळ घालत पुन्हा त्याला दमदाटी केली. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करताना आकारण्यात आलेले हे भयानक व्याज पाहून पोलिसही चक्रावले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून दर्पण याला अटक केली आहे. अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत.


दरम्यान, दर्पण याने अशा प्रकारे अनेक गरजू नागरिकांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देत पिळवणूक केली असून याचा तपास पोलीस करत आहेत. पीडित  लोकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी केले आहे.