Kalyan Latest Crime News : दिवसाढवळ्या घरात चोरी करणाऱ्या शाहरुख खान या 20 वर्षीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पश्चिम येथील रामदासवाडी परिसरात शाहरुख खान चोरी करण्यासाठी एका घरात गेला होता. त्यावेळी तेथील काही नागरिकांनी त्याला पकडलं अन् पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 


दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. कल्याण पश्चिममधील रामदास वाडी परिसरात आज ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुख खान असं या चोरट्यांचं नाव आहे. शाहरुख खानविरोधात याआधी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा परिसरात राहणारा 20 वर्षीय शाहरुख फिरोज खान हा सराईत चोरटा आहे. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे हा चोरटा दिवसाढवळ्या इमारतीत किंवा चाळी परिसरात घराचे दरवाजे उघडे असल्याचा फायदा घेत होता. शाहरुख घरातील मौल्यवान वस्तू लंपास करायचा. मात्र या शाहरुखचा डाव कल्याणमध्ये फसला. 


कल्याण मधील रामदासवाडी परिसरात 63 वर्षीय सेवानिवृत्त प्रेमनाथ मोदगीकर राहतात. रविवारी दुपारी प्रेमनाथ यांच्या पाचव्या माळ्यावरील घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी घरातील काही जण बाहेर गेले होते. घरात प्रेमनाथ यांची मुलगी सीमरन एकटीच होती. ती किचनमध्ये होती. तिचा मोबाईल हॉलमध्ये होता. कुणीही नसल्याचे पाहून शाहरूख खाने याने गुपचूप घरात प्रवेश केला व  मोबाईल घेऊन तो पळू लागला. सीमरनला याची चाहूल लागताच तिने शाहरुखचा पाठलाग केला. तिने या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने सीमरनला जोरात धक्का देऊन खाली पाडले. या संधीचा फायदा घेऊन तो पळून गेला. मात्र सीमरनने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी शाहरुखला पकडले. त्यानंतर त्याला कल्याणमधील महात्मा फुले पोलिस स्टेशनमधील पोलिसांच्या ताब्यात दिले. 


पोलिसांनी शाहरुखला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली. सुरुवातीला त्यानं काहीही सांगण्यास नकार दिला,  पण पोलिसांनी खाकी दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शाहरुख खान याने याआधी पाच गुन्हे केल्याची कबुली देत त्या घरातून चोरलेला मुद्देमालही पोलिसांना दिला. सध्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.