ठाणे : कल्याणामधील एका 45 वर्षीय पतीने त्याच्या 28 वर्षीय पत्नीला पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तगादा लावला. मात्र तिने नकार दिला. तसेच पहिल्या पत्नीला देण्यासाठी दुसऱ्या पीडित पत्नीला माहेरावरून 15 लाख आणण्यास सांगितले. मात्र, तिने रक्कम देण्यासही नकार दिल्याने आरोपी पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली.  कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी  बाजारपेठ पोलीस ठाण्यात तलाक विरोधी कायदासह विविध कलमानुसार 45 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय आरोपी पती  हा कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहत असून तो सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. त्याचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीशी जानेवारी 2024  मध्ये झाला. त्यानंतर पीडित पत्नी कल्याणला सासरी आली असता आरोपी पतीचा पहिला विवाह झाल्याचं  समोर आले.


पहिल्या पत्नीला देण्यासाठी 15 लाखांची मागणी


सुरुवातीचे काही महिने गुण्यागोवींदाने संसार सुरू असतानाच आरोपी पती तिला सतत माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास देऊ लागला. त्याने तिला सांगितले की, पहिल्या पत्नीला घटस्फोटासाठी 15 लाख रुपये द्यायचे आहेत. ते पैसे तुझ्या माहेरातून आण. यावरच आरोपी पती थांबला नाही. तर  त्याने  पत्नीला ऑफिस पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची  मागणी केली. या मागणीला तिने स्पष्ट नकार दिला. यामुळं वाद होऊन   रागाच्या भरात पतीने तिला मारहाण करत तिहेरी तलाक देऊन घराबाहेर काढले. 


दरम्यान, पीडित पत्नी माहेरी आल्यावर तिने 19 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथील जिन्सी पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा कल्याण शहरात घडल्याने तो बाजारपेठ पोलीस ठाण्यात 20 डिसेंबर रोजी वर्ग केला. त्यानंतर कल्याणच्या बाजारपेठ  ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 


तक्रारीनंतर पोलिसांनी पतीच्या विरोधात तीन तलाक आणि मारहाणीचे गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे. पतीने तीन तलाक दिल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकारामुळे समाजातील अशा घटनांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता पुढे येत आहे.


ही बातमी वाचा: