Kalyan Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी पती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. मी माझ्या बायकोची हत्या करुन आलो आहे, असे सांगत स्वतःच पोलिस ठाण्यात पोहोचला. यामुळं पोलिसही काही काळ चक्रावून गेले होते. विशाल भुतकर असं आरोपी पतीचं नाव आहे.
नाशिक येथील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एक व्यक्ती आपल्या भावाला घेऊन आला होता. त्यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की, “माझा भाऊ काय बोलतो ते तुम्ही ऐका.” त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक कबुली दिली. माझा माझ्या पत्नीशी वाद झाला होता. त्यानंतर मी कल्याण येथे गेलो. उंबर्डे परिसरात ती राहत होती. तिथे तिच्या घरी जाऊन मी तिचा गळा आवळून खून केला, असे विशालने सांगितले. ही कबुली ऐकून पोलिसही काही काळ हैराण झाले. विशाल सांगत असलेली माहिती खरी आहे का याची खात्री करण्यासाठी नाशिक पोलिसांनी तातडीने कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर खडकपाडा पोलिसांचे पथक विशालने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले असता घरात एक महिला मृतावस्थेत पडलेली आढळून आली. मृत महिलेची ओळख अर्चना भुतकर अशी झाली आहे.
विशाल आणि अर्चना यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता
प्राथमिक माहितीनुसार, विशाल आणि अर्चना यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. दोघांना दोन मुले असून त्यापैकी एक मूल विशालकडे तर दुसरे मूल अर्चनाच्या आईकडे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे विशालने संतापाच्या भरात अर्चनाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी माहिती दिल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.
अर्चना ही स्वभावाने प्रेमळ असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे अर्चना चा पती खूप दिवसांनी घरी आल्याने गोडधोड जेवणाचा बेत आखला गेला जेवण झाल्यावर विशाल सोबत असलेला त्याचा मुलगा भावाकडे सोडून आला आणि त्याच रात्री विशाल पुन्हा अर्चनाकडे गेला या दोघांमध्ये असे काय घडले विशालने अर्चना चा गळा आवळून गळ्यावर वार करत तिचा काटा काढला. त्या रात्री नेमक काय घडलं कल्याण खडकपाडा पोलीस तपास करत आहेत.