कल्याण : भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत घरी परतणाऱ्या नागरिकाला लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कल्याण क्राईम ब्रान्चने (Kalyan Crime Branch) बेड्या ठोकल्या आहेत. सनी तूसांबड असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून डोंबिवली पश्चिमेकडील 52 चाळ परिसरातून कल्याण क्राईम ब्रान्चने बेड्या ठोकल्यात. त्याचा साथीदार अक्षय अहिरे पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत . सनी व अक्षय विरोधात याआधी देखील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत .
डोंबिवली पूर्वेकडील बंदिश चौकातील कालीकामाता चाळीत राहणारे रणजित शंकर गलांडे मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास शेलार नाक्यावरून रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाले. इतक्यात सनी तुसांबड आणि त्याचा साथीदार अक्षय अहिरे या दोघांनी रणजित यांच्या पोटाला चाकू लावला. तसेच धमकी देऊन या लुटारूंनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील 10 हजारांचा मोबाईल हिसकावून घेतला. इथेच न थांबता लुटारू व्यक्तीने पुन्हा चाकूचा धाक दाखवून रणजित यांच्या मोबाईलमधील गुगल-पेचा युपीआय आयडी पिन नंबर मागवून घेतला. आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची धमकी देऊन लुटारूंनी रणजित यांच्या गुगल-पेच्या आधारे बँक खात्यातून 12 हजार 100 रूपये काढून घेतले. त्यानंतर लुटारू पसार झाले. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
आरोपीला अटक
दरम्यान क्राईम ब्रान्चच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू केला. पोलीस कर्मचारी विश्वास माने आणि गुरूनाथ जरग यांना सनी तुसांबड हा पश्चिम डोंबिवलीतील बावन्न चाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडवर येणार असल्याची माहिती मिळाली.तत्काळ पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, संजय माळी ,कर्मचारी विश्वास माने,बापुराव जाधव, गुरूनाथ जरग यांच्या पथकाने सापळा रचत सनी तुसांबड याला अटक केली त्याचा साथीदार अक्षय अहिरे हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे . सनी तुसांबड आणि अक्षय अहिरे हे दोघेही सराईत गुन्हेगार असून या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ओला कॅब बुक करायचे अन् नंतर चाकूचा धाक दाखवून लुटायचे
डोंबिवली पूर्वेकडील चोळेगाव परिसरातील एका प्रवाशाने मोबाईलवरून ओला अँपद्वारे इच्छितस्थळी जाण्यासाठी ओला कॅब पहाटेच्या सुमारास बुक केली होती . त्यानंतर काही वेळातच बुक केलेली ओला कॅब करून त्या कारमध्ये चार लुटारू प्रवाशी बोलून बसले. त्यानंतर कार निर्जनस्थळ असलेल्या ठाकुर्ली पुर्व भागातील रस्तावरून जात असताना अचानक एका लुटारुने चालकाच्या गळ्यावर कटर लावून धमकी देत, कार खाली उतरण्यास सांगितले. चालकही घाबरून कारच्या बाहेर येताच इतर लुटारूंनी कारमधील रोकड आणि चांदीचे पैंजण, मोबाईल असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन पळून गेले.