Kalyan Court News : कल्याण न्यायालयातून आज एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका वकिलाने आयफोनमधील (iPhone) एअरड्रॉप (AirDrop) या सुविधेचा गैरवापर करत अनेक महिला वकिलांचे खासगी डेटा आणि फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकारामुळे कल्याण कोर्टाच्या आवारात आज प्रचंड गोंधळ उडाला. गेल्या काही दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.

Continues below advertisement

हा संपूर्ण प्रकार वकील महेश जाधव नावाच्या वकिलाकडून सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून तो कोर्टातील महिला वकिलांवर पाळत ठेवून होता. मात्र, आज एका सतर्क महिला वकिलाने संशय आल्याने थेट तपास केला आणि महेश जाधव याला या कृत्यादरम्यान रंगेहात पकडले. त्याने इतर महिला वकिलांचे फोटो आणि डेटा चोरल्याचे उघड होताच कोर्टात एकच खळबळ उडाली.

Kalyan Lawyer Beaten : वकिलाला दिला बेदम चोप

महेश जाधव याने एक-दोन नव्हे, तर तब्बल 10 ते 15 महिला वकिलांच्या मोबाईलमधून त्यांचे वैयक्तिक फोटो आणि डेटा एअरड्रॉपद्वारे चोरल्याचे तपासात समोर आले. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर कोर्टातील महिला वकिलांचा संयम सुटला. संतप्त झालेल्या महिला वकिलांनी आरोपी वकील महेश जाधव याला कोर्टाच्या आवारातच सर्वांसमक्ष बेदम चोप दिला. या मारहाणीमुळे कोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Continues below advertisement

Mahatma Phule Police Kalyan : आरोपी वकील पोलिसांच्या ताब्यात

महिला वकिलांनी महेश जाधव याला चांगलाच धडा शिकवल्यानंतर, त्याला थेट कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला वकिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश जाधव याला ताब्यात घेतले असून, त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि आयफोनच्या एअरड्रॉपचा गैरवापर कसा केला, याचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

ही बातमी वाचा: