Junnar Minor Crime Case : पुण्याच्या नसरापूर येथील धक्कादायक घटनेतून समाजमन सावरत नाही तोच, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्याला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणीदरम्यान थेट दोषारोपपत्र (Charge Sheet) सादर करून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे.
Pimpalwandi Crime Details : उसाच्या शेतात अत्याचार अन् गळा दाबून संपवलं
मंगळवार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास गावात सामसूम असताना, शेजारी राहणाऱ्या आरोपीने 9 वर्षांच्या बालिकेला फुस लावून निर्मनुष्य उसाच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिला संपवलं. पुरावे नष्ट करण्यासाठी तिला मारहाण करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही त्याने केला.
मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला आरोपी स्वतः निर्लज्जपणे ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत शोधमोहिमेत सहभागी झाला होता.
Junnar Pimpalwandi Case : सीसीटीव्ही फुटेज पाहताना आरोपीची एका चुकीमुळे पोलखोल
पोलिसांच्या तपासादरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. पोलीस आणि ग्रामस्थ जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासत होते, तेव्हा हा आरोपीदेखील त्यांच्यासोबतच बसलेला होता. फुटेजमध्ये सायकलवरून जाणारी एक व्यक्ती दिसताच 'मीच सायकलवरून चाललोय' असं आरोपी स्वतःहून बोलून गेला आणि पोलिसांना तपासाचा पहिला महत्त्वाचा क्लू मिळाला.
त्यानंतर दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीच सायकल डावीकडे वळताना दिसली. आरोपीने मळ्यात गेल्याचा दावा केला होता, परंतु त्या मार्गावरील कॅमेऱ्यात तो दिसला नाही. पोलिसांचा संशय बळावताच त्याला गाडीत बसवून पोलिसी हिसका दाखवला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तागाच्या शेतीजवळील पाईपच्या खाली चिमुकलीचा मृतदेह लपवल्याचे त्याने पोलिसांना दाखवून दिले.
Sandeep Gill SP Statement : 15 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करणार
घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. "आरोपीला अटक करण्यात आली असून तो शेतमजुरीचे काम करतो. या प्रकरणात तो एकटाच आरोपी आहे. पीडित बालिकेचे शवविच्छेदन (Post Mortem) सुरू आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या 15 दिवसांच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल केले जाईल आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून दिली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
Fast Track Court Demand: परिसरात संतापाची लाट
या दुर्दैवी आणि घृणास्पद घटनेनंतर पिंपळवंडी आणि जुन्नर परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुकलीला त्वरित न्याय मिळावा यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवून आरोपीला फाशीची किंवा कठोरतम शिक्षा देण्याची एकमुखाने मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ही बातमी वाचा:
