मुंबई : खार परिसरातील खुनी न्यू ईयर पार्टीमधील दोघांनी मिळून 19 वर्षीय जान्हवी कुकरेजा खून केला होता. त्यानंतर खार पोलिसांनी या हत्येच्या आरोपाखाली श्री जोगधनकर आणि दीया पडनकर यांना अटक केली होती. घटनेच्या चार दिवसांनी आरोपी दीयाने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात सांगितलं की, दुसरा आरोपी श्रीने पार्टीमध्ये येण्यापूर्वी ड्रग्स घेतल्या होत्या. दरम्यान, दीयाने सांगितलेल्या गोष्टी स्पष्ट करणाऱ्या कोणत्याही बाबी पोलिसांच्या हाी नाहीत. या घटनेसंदर्भात बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्या पार्टीमध्ये कोणी-कोणी ड्रग्जचं सेवन केलं होतं, किंवा केलेलं नाही, हे स्पष्ट करण्यासाठी सर्वांचे ब्लड सॅम्पल्स आणि युरिन सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. अद्याप याचा अहवाल आलेला नाही.
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पार्टी यश आहूजाने ऑर्गनाइज केली होती. ज्याचा नियम होता की, 'BYOB'. म्हणजेच, पार्टीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना ज्या ब्रँडचं मद्य सेवन करायचं असेल, ते त्यांला स्वतः घेऊन यावं लागेल. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एकूण 12 लोक सहभागी होते. ज्यामध्ये 5 मुली होत्या. त्या पार्टीमध्ये केवळ श्री हाच एकटा असा होता, जो वेफाम झाला असून त्याच्यावर कोणतंच नियंत्रण राहिलं नव्हतं. तो त्या पार्टीमध्ये दीया पडनकरसोबत सहभागी झाला होता.
जान्हवीच्या आईने दिली ही माहिती
मृत जान्हवीची आई निधि कुकरेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या दिवशी रात्री ते जान्हवीचे वडिल प्रकाश कुकरेजा यांचा वाढदिवस साजरा करत होते. त्याच दिवशी जान्हवीने आपल्या वडिलांचा शेवटचा जन्मदिवस साजरा केला. 12 वाजता सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. जवळपास 12 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्या घरी आरोपी श्री आणि दीया आले आणि त्यांनी जान्हवीला सोबत येण्यास आग्रह केला. आईची परवानगी मिळताच तिघंही तिथून निघून खारमधील भगवती हाइट्समध्ये पोहोचले, जिथे रुफ टॉपवर पार्टी सुरु होती.
आरोपी श्रीचा काही कट होता?
या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली की, श्री आणि जान्हवी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत होते. जान्हवी श्रीबाबत खूपच सिरीयर होती. पण श्री त्या पार्टी जे काही करत होता, त्यावरुन चित्र मात्र वेगळंच दिसत होतं. त्या व्यक्तीने जवळपास 12 वाजून 20 मिनिटांनी श्री आणि जान्हवी एकमेकांच्या खूप जवळ असलेलं पाहिलं. त्यानंतर दीया एका सोफ्यावर जाऊन झोपली, त्यावेळी ती नशेत होती. श्रीदेखील दीयाजवळ गेला आणि तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागला. ही गोष्ट जान्हवीला आवडली नाही आणि ती टॅरेसच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. त्यानंतर जान्हवीने आपल्या एका मित्राला फोन करुन श्रीच्या सर्व गोष्टींबाबत माहिती दिली.
तिघांमध्ये भांडणाला सुरुवात
मुंबई पोलिसांनी सांगितलं की, ज्यावेळी जान्हवी आपल्या मित्रासोबत फोनवर बोलत होती, त्यावेळी तिने पाहिलं की, श्री आणि दीया एकत्र टेरेसवरुन खाली जात आहेत. त्यानंतर जान्हवीने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर इमारतीच्या एका मजल्यावर जान्हवीने दीया आणि श्रीला एकमेकांसोबत पाहिलं. जान्हवीला ही गोष्ट सहन झाली नाही. त्यानंतर जान्हवी आणि दीयामध्ये भांडणांना सुरुवात झाली. त्यानंतर जान्हवीने दीयाला धक्का दिला आणि दीयाचं तोंड बाजूच्या रेलिंगवर आपटलं, त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. त्यामुळे दीया यश आहुजाच्या घरी जाऊन झोपली. पण त्यानंतर काय झालं याची तिला कल्पना नाही.
पोलिसांनी याप्रकरणी दिलेली माहिती
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 2 वाजता दीया गेल्यानंतर जान्हवी आणि श्रीमध्ये भांडणांना सुरुवात झाली. दोघांनीही एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. भांडणांमध्ये दोघेही पायऱ्यांवरुन खाली पडले आणि दोघांनाही लागलं. त्यावेळी श्रीने जान्हवीच्या डोक्यातून रक्त येताना पाहिलं आणि त्याने तिथून पळ काढला.
कत्र्यामुळे जान्हवीबाबत मिळाली माहिती
त्याच इमारतीमध्ये राहणारी एक महिला आपल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आली होती. त्यावेळी तिचा कुत्राही तिच्यासोबत होता. त्या बिल्डिंगच्या सीसीटीव्ही फोटेजनुसार, 2 वाजून 32 मिनिटांनी जेव्हा ती महिला आपल्या कुत्र्यासोबत खाली उतरली, त्यावेळी तो कुत्रा महिलेला पायऱ्यांच्या दरवाज्याजवळ घेऊन गेला. तिथे रक्ताच्या खारोळ्यात जान्हवी पडली होती. त्यानंतर त्याबाबत महिलेने यश आहुजाला माहिती दिली आणि पोलिसांना कळवलं. तसेच अॅम्बुलन्सही बोलावली. पोलिसांनी सांगितलं की, जर त्यावेळी कुत्रा बाहेर आला नसता, तर कदाचित सकाळपर्यंत जान्हवीबाबत कोणालाच माहिती मिळाली नसती.
जान्हवीच्या कुटुंबियांनी घेतली पोलिसांची भेट
दरम्यान, मंगळवारी जान्हवीच्या आई-वडिलांनी मुंबई पोलीस कमिश्नर परमबीर सिंह, ज्वॉइंट कमिश्नर लॉ एंड ऑर्डर विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली. तसेच सखोल तपास करण्याचं आवाहन केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
उद्योजक रतन टाटा यांच्या गाडीच्या नंबरचा बेकायदेशीरपणे वापर; महिलेविरोधात गुन्हा दाखल