DG Prisons found murdered: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सोमवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना समोर आली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया (Jammu Kashmir Police DGP Prision) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे पोलिसांना त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. सध्या हा मदतनीस फरार झाला असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी या मदतनीसाचा शोध सुरू केला आहे. 


हेमंत लोहिया हे 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शहराबाहेरील परिसरात असलेल्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. लोहिया यांच्या घरातील मदतनीस फरार आहे. त्याच्या शोधासाठी काही पथके तयार करण्यात आली आहे. तर, लोहिया यांच्या घरी फॉरेन्सिक टीमने पाहणी केली.


पोलिसांना लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोहिया यांच्या पायाला तेल लावले असल्याचे आढळून आले. त्यांचा पाय काहीसा सुजला होता. मारेकऱ्याने लोहिया यांना गुदमरून ठार केले. त्यानंतर केचअपच्या बॉटलच्या काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.


लोहिया यांना ऑगस्ट महिन्यात पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) जबाबदारी देण्यात आली होती. जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनीदेखील पोलीस दलाच्यावतीने दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेचा तपास सुरू असून घटनास्थळाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत लोहिया यांच्या हत्येची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर आले. गुप्तचर यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत. 


दरम्यान,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आपल्या तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या कालावधीत ही मोठी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अमित शाह आपल्या नियोजित दौऱ्यानुसार,  माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर राजौरी येथील एक जाहीर सभेस संबोधित करणार आहेत. या ठिकाणी काही विकास प्रकल्पांचे लोकापर्ण आणि भूमीपूजन करणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: