जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
हत्या प्रकरणात घटनेच्या दिवशी दोघांनी सोबत मद्यप्राशन केलं. त्यानंतर, जंगलात गेल्यावर डोक्यात बियरची बाटली मारून आरोपीने आकांक्षाला बेशुद्ध केलं

जळगाव : जिल्ह्याच्या एरंडोल (Jalgaon) तालुक्यातील पद्मालय येथील जंगलात महिलेला जाळून तिची निघृण हत्या केल्याच्या घटनेचा पोलिसांकडून अवघ्या 48 तासाच्या आत पर्दाफाश करण्यात आला. जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेली मयत महिला तृतीयपंथीय असल्याचे समोर आले असून तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधातून तिची निघृण हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आकांक्षा उर्फ अजय गेंद्रे असे मयत 26 वर्षीय तृतीयपंथीयाचे नाव असून स्वप्निल पाटील असे 21 वर्षीय अटकेतील आरोपीचे नाव आहे.
हत्या प्रकरणात घटनेच्या दिवशी दोघांनी सोबत मद्यप्राशन केलं. त्यानंतर, जंगलात गेल्यावर डोक्यात बियरची बाटली मारून आरोपीने आकांक्षाला बेशुद्ध केलं, आणि त्यानंतर तरुणाने तिची जाळून हत्या केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुण हा नाशिकमध्ये पोलिस भरतीची तयारी करत असताना त्याची आकांक्षासोबत ओळखी आणि त्यानंतर प्रेमसंबध निर्माण झाले. स्वप्नीलला आकांक्षासोबत नाते ठेवायचे नव्हते. मात्र, नाते पुढे कायम राहावे, स्वप्नीलने कायम सोबत रहावे म्हणून आकांक्षांचा आग्रह होता. स्वप्नील नाते तोडण्याचा प्रयत्न करत असल्याने आकांशाने स्वप्निलच्या गावी, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्याची बदनामी केली होती. आपली सर्व ठिकाणी बदनामी झाल्याच्या आणि होत असल्याच्या रागातून स्वप्नील संतप्त होता. तसेच आकांक्षाकडून होत असलेल्या त्रासाच्या रागातूनच स्वप्निलने नियोजनबद्ध रित्या आकांक्षाची निर्घुणपणे हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली, असे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
हॉटेलमधील सीसीटीव्हीमुळे आरोपीस अटक
दरम्यान, हत्येपूर्वी एका हॉटेलात दोघांनी मद्यप्राशन केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आधी तरुणाला अटक केली आणि त्याच्या कबुलीनंतर घटनेचा उलगडा झाला आहे. जगंलात जळालेल्या अवस्थेत मयताचे केवळ हात आणि पाय मिळाल्याने मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा कुठलाही मार्ग नसताना अवघ्या 48 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यामुळे, गेल्या 48 तासांत गुढ असलेल्या हत्येच्या घटनेचा पर्दापाश करण्याची कामगिरी पोलिसांकडून करण्यात आली आहे. 4 फेब्रुवारी रोजी एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, एरंडोल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिकच्या टीमकडून घटनास्थळी पंचनाम्याचे काम केल्यानंतर पोलिसांकडून मृत महिलेची ओळख पटवण्यात आली.
हेही वाचा
मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून नको नको ते करायला सांगायचा; सुनील पवारला अटक, मुंबईतील हादरवणारी घटना
























