Jalgaon Crime: बँकेतून शेतीकामासाठी दोन लाख रुपये काढले, दुचाकीच्या डिक्कीत पैसे ठेवत होते; मात्र, त्याचवेळी चोरट्यांनी अशी शक्कल लढवली की, काही क्षणांतच शेतकऱ्याची संपूर्ण रक्कम लंपास झाली. ‘काका, तुमचे पैसे पडलेत,’ असे सांगत एका चोरट्याने शेतकऱ्याचे लक्ष विचलित केले, तर दुसऱ्याने दुचाकीच्या डिक्कीतून पैशांची पिशवी चोरली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात भडगाव रस्त्यावरील एका बँकेसमोर भरदिवसा ही धक्कादायक घटना घडली. प्रकाश जिवराम पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते एरंडोल तालुक्यातील उत्राण गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; चोरट्यांनी अशी साधली संधी
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील शेतकरी प्रकाश जिवराम पाटील हे शेतीकामासाठी पैशांची व्यवस्था करण्याकरिता पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावरील एका बँकेत गेले होते. त्यांनी बँकेतून दोन लाख रुपये काढले. त्यानंतर ही रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्यास सुरुवात केली.
याचवेळी तिथे असलेल्या चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले. एका चोरट्याने जमिनीवर काही नोटा टाकल्या आणि प्रकाश पाटील यांना ‘काका, तुमचे पैसे पडलेत,’ असे सांगितले. आपले पैसे खाली पडल्याचे समजून पाटील नोटा उचलण्यासाठी खाली वाकले. नेमकी हीच संधी साधत दुसऱ्या चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये असलेली पिशवी काढून घेतली. पैशांची पिशवी हातात लागताच चोरट्याने आपल्या साथीदारासह दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला.
Jalgaon Crime: शेतीकामासाठी आणलेली दोन लाखांची रक्कम चोरीला
प्रकाश पाटील यांनी शेतीकामासाठी बँकेतून ही रक्कम काढली होती. शेतीच्या कामासाठी उपयोगात येणारे पैसे अशा प्रकारे चोरीला गेल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बँकेतून पैसे काढल्यानंतर ते सुरक्षितपणे घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच चोरट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून डाव साधला. या घटनेत चोरट्यांनी वापरलेली पद्धत लक्षात घेता, नागरिकांनी बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Jalgaon Crime: चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद झाल्याची माहिती आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस संशयित चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांनी नेमकी कोणती दुचाकी वापरली, त्यांची ओळख काय आणि ते कोणत्या दिशेने पसार झाले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. भरदिवसा बँकेसमोर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
