Jalgaon Crime News : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील कुसुंबा गावात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी (4 ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास गणपती नगर परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर दुचाकीवरून येत अंदाधुंद गोळीबार आणि दगडफेक केली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Jalgaon Crime News : दगडफेक आणि तीन राऊंड फायर
कुरिअर कंपनीत काम करणारे चंद्रशेखर पाटील हे पत्नीसोबत घरी जेवत असताना ही घटना घडली. घराबाहेर अचानक तीन दुचाक्या थांबल्या आणि त्यावरून पाच ते सहा अज्ञात तरुण उतरले. त्यांनी शिवीगाळ करत दगडफेक सुरू केली, ज्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि घराबाहेर लावलेली दुचाकीही फोडण्यात आली.
यानंतरच काही हल्लेखोरांनी आपल्याजवळील शस्त्रातून घराच्या दिशेने तीन वेळा गोळीबार केला. अचानक झालेल्या फायरिंगने पाटील कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर हादरला. या गोळीबारात कुणीही जखमी झाल्याची माहिती नसली तरी घराचे आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
Jalgaon Crime News : पोलीस यंत्रणेची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून तीन गोळ्यांच्या पुंगळ्या जप्त केल्या. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या प्रकरणात पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
Jalgaon Crime News : जुन्या वादातून हल्ला
या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, जुन्या वादातून ही कारवाई झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा