Jalgaon Crime News: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पारोळा (Parola) तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत (Gram Sabha) झालेल्या गदारोळातून एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ग्रामसभेत काही नागरिकांनी केलेल्या हुल्लडबाजी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रयत्नामुळे आलेल्या तीव्र मानसिक तणावातून ग्रामसेवक पी. एन. पाटील (Gram Sevak P N Patil) यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना 16 ऑगस्ट रोजी घडली असून, या प्रकरणी रात्री उशिरा 6 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Jalgaon Crime News: नेमका काय घडला प्रकार?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरे गावात 16 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान काही ग्रामस्थांनी अचानक आक्रमक होत सरपंच आणि ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना टार्गेट केले. काही तरुणांनी पाटील यांना जाब विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ग्रामसेवक पी. एन. पाटील हे प्रचंड घाबरले आणि त्यांना मोठा मानसिक तणाव येऊन अस्वस्थ वाटू लागले.

Jalgaon Crime News: अस्वस्थतेत दवाखान्याकडे धाव, पण तरुणांकडून पाठलाग

तब्येत बिघडल्याने तणावाखाली असलेल्या पाटील यांनी ग्रामसभा अर्धवट सोडून स्वतःच्या दुचाकीने पारोळा येथील सिव्हिल रुग्णालयाकडे जाणे पसंत केले. मात्र, तरीही काही तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. या पाठलागामुळे पाटील यांनी अत्यंत तीव्र धसका घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Continues below advertisement

Jalgaon Crime News: ग्रामसेवक संघटना व करणी सेना आक्रमक

ग्रामसेवक पी. एन. पाटील यांच्या मृत्यूची बातमी पसरताच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. पारोळा, जळगाव, अमळनेर, भडगाव आणि पाचोरा येथील ग्रामसेवक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात (Police Station) धाव घेत ठिय्या आंदोलन केले. मोबाईल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या आंदोलनाला 'करणी सेने'च्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवत तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

Jalgaon Crime News: 6 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

आंदोलन आणि वाढता दबाव लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी रात्री उशिरा हुल्लडबाजी आणि पाठलाग करणाऱ्या 6 संशयित आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पारोळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस (Police) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!