Jalgaon Crime News: सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामधील (Jalgaon) धरणगाव तालुका (Dharangaon Taluka)  एका हत्येच्या घटनेने हादरलं. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ताट वाजवताना हटकल्याने रागाच्या भरात चार ते पाच जणांनी एकाची हत्या केली. धरणगाव तालुक्यातील कृष्णा कापूस जिनमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.


नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धरणगावमधील कृष्णा जिनमध्ये राहणाऱ्या काही बिहारी मजुरांनी रात्री दहा वाजता ताटल्या वाजविण्यात सुरुवात केली होती. यावेळी याच परिसरात राहणाऱ्या काळू सोनवणे या मजुरांने त्यांना ताट वाजवू नका असे सांगत त्यांना ताट वाजवण्यास मज्जाव केला.


ताट वाजवण्याच्या कार्यक्रम ऐन रंगात आला असताना काळू सोनवणे यांनी हटकले. काळू सोनावणे यांनी हटकणे हे बिहारी मजुरांना खटकले. त्यानंतर त्यातून शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी संख्येने जास्त असलेल्या बिहारी मजुरांनी काळू सोनवणे यांना मारझोड करण्यास सुरुवात केली. यात एका मजुरांनी काळू सोनवणे यांच्या डोक्यात थेट लाकडी दांडक्याने वार केले. या तीव्र हल्ल्याने काळू सोनावणे हा गंभीर जखमी झाला. त्याला इतर मजुरांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थली धाव घेतली. पोलिसांनी चार ते पाच संशयित मजुरांना ताब्यात घेतले आहे. तर काही मजूर फरार होण्यात यशस्वी झाले आहे. या घटने मागील नेमकं कारण काय? या वादाला यापूर्वीच्या वादाची किनार होती का, आदी मुद्यांवरही पोलिसांकडून तपास सुरू आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.


नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ही हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पळून गेलेल्या संशयित मजूरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 


अजनीमध्ये अपघातात कार चालक जखमी


अजनी रेल्वे आरक्षण केंद्राजवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 27 वर्षीय कार चालक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे दोन ते अडीच दरम्यान हा अपघात झाला. रस्त्याच्या दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त कार अनेक फूट लांब जाऊन पलटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार मेडिकल चौकाकडून अजनी पुलाच्या दिशेने जात असताना रेल्वे आरक्षण केंद्राच्या जवळ दुभाजकाला धडकली. दुभाजकावरील काँक्रीटच्या पिल्लरला जोरदार धडक दिल्यानंतर कार काही फूट लांब जाऊन पलटली. सुदैवाने कारचे एअर बॅग वेळीच उघडले गेले आणि त्यामुळे चालकाचा जीव वाचला.