Jalgaon Crime: जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रसवंतीची गाडी जप्त केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने थेट महापालिका प्रांगणात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणाने महापौर दीपमाला काळे यांच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. सुदैवाने, घटनेच्या वेळी महापौर वाहनात नसल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकारानंतर महापौरांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच महापालिकेतील सुरक्षाव्यवस्था वाढवून अतिरिक्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे आदेशही दिल्याचे समजते.
Jalgaon Crime: रसवंतीची गाडी जप्त केल्याने तरुणाचा संताप
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या रसवंतीच्या गाडीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान संबंधित गाडी जप्त करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने महापालिका प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर संबंधित तरुण मद्यपान केलेल्या अवस्थेत महापालिका कार्यालयात पोहोचला आणि त्याने परिसरात गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. अतिक्रमण कारवाईचा राग मनात धरून त्याने महापालिका प्रांगणात उभ्या असलेल्या महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनाकडे मोर्चा वळवला.
Jalgaon Crime: महापौरांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ल्याचा प्रयत्न
महापालिका प्रांगणात महापौरांचे वाहन उभे असताना संबंधित तरुणाने लोखंडी रॉडने त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वाहनचालकाने वेळीच हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला वाहनापासून दूर केले. घटनेच्या वेळी महापौर दीपमाला काळे या वाहनात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
Jalgaon Crime: महापौरांचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. महापालिकेच्या आवारात येऊन वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न आणि गोंधळ घालण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच महापालिकेत जास्तीचे सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
