Jalgaon crime : जळगावच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भर दिवसा मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने तब्बल 12 राउंड फायर करत संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . वाळूमाफिया आणि स्थानिक गटातील संघर्षातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे .या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत तरुणाच्या शरीरावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याच्या शरीराची चाळण झाली होती .आकाश कैलास मोरे असे मृत तरुणाचे नाव आहे . या घटनेचा अधिक तपास सुरू आहे . (Crime News)
प्राथमिक माहितीनुसार, आकाशचा संबंध वाळू उत्खनन आणि वाहतूक व्यवसायाशी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आकाश बसस्थानक परिसरात उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गावठी कट्ट्यातून 12 राऊंड फायर केले. गोळ्यांच्या माऱ्यामुळे तरुण जागीच कोसळला.
दोन दिवसांपूर्वी आरोपीचे स्टेटस
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी आकाशने आपल्या सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. "शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो..." अशा भाषेत केलेल्या स्टेटसनंतरच त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यामुळे ही हत्या वैयक्तिक वैरातून झाली की वाळू व्यवसायातील वर्चस्व दाखवण्यासाठी घडवली गेली, याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत.
आकाशच्या शरीरावर तब्बल 12 गोळ्या लागल्याची माहिती असून, त्याच्या मृतदेहाची स्थिती अत्यंत भीषण होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिकांकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू आहे. पाचोरा शहरात या घटनेनंतर भीतीचं वातावरण पसरले आहे. राज्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोकं वर काढलं असून यातून होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शेतीच्या जुन्या वादातून हत्या,बुलढाण्यातील घटना
लोणार तालुक्यातील वढव या गावचे 60 वर्षीय अशोक आबाजी सोनुने हे 11 मे रोजी लोणार पोलीस स्टेशनला जात आहे, असं सांगून घरून निघून गेले. मात्र ते सायंकाळी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेत असला असता ते मिळून आले नाही. यावरून त्यांच्या पत्नीने लोणार पोलीस स्थानकात हरविल्याची तक्रार दिली होती. मात्र काही दिवसानंतर अशोक सोनुने यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. याप्रकरणी लोणार पोलिसानी गुन्हा दाखल करून चौकशी केली असता पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शेतीच्या जुन्या वादातून ही हत्या झाली असून आरोपी हे अशोक सोनुने यांच्या भावकीतीलच असल्याचं निष्पन्न झालं आहे.