IIT Bombay Student Ended his life In Hostel : पवई येथील आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद शुक्रवारी (18 सप्टेंबर) आयआयटी परिसरात उमटले असून, संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे काही काळ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी बी.टेक.चा (B.Tech) विद्यार्थी होता. 

Continues below advertisement

परीक्षेदरम्यान तो कॉपी करताना पकडला गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्याच्यावर शैक्षणिक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. एका वर्षासाठी निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती त्याला देण्यात आल्याने तो घाबरला असल्याचा दावा काही विद्यार्थीकडून केला जात आहे. यानंतर विद्यार्थी हॉस्टेलमध्ये परतला आणि संध्याकाळच्या सुमारास त्याने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे परीक्षेतील कारवाई आणि विद्यार्थ्याच्या मृत्यूचा थेट संबंध असल्याचे सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही.

विद्यार्थ्यांचा कॅम्पसमध्ये आक्रोश

Continues below advertisement

घटना समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईतील अनेक विद्यार्थी कॅम्पसमध्ये एकत्र आले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केल्याची माहिती आहे. या घटनेबाबत पारदर्शक चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक तसेच मानसिक दबावाच्या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, आयआयटी मुंबईच्या अधिकृत नियमांनुसार विद्यार्थ्यांकडून शिस्तभंग झाल्यास शैक्षणिक किंवा प्रशासकीय कारवाईची तरतूद आहे. कॅम्पसमध्ये आंदोलन किंवा निदर्शने करण्यासाठीही संस्थेची आणि स्थानिक पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे आयआयटीच्या नियमांमध्ये नमूद आहे.

नेमकं कारण काय? तपास सुरू

या घटनेमागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परीक्षेतील कथित गैरप्रकार, त्यानंतरची संभाव्य कारवाई आणि विद्यार्थ्यावर असलेला दबाव याबाबत विविध दावे समोर येत आहेत. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

IIT बॉम्बेची प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थी परीक्षा कक्षात मोबाईल फोन वापरताना आढळून आला. त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका उत्तरे मिळवण्यासाठी ChatGPT वर अपलोड केली होती. यानंतर विद्यार्थी आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. या दुःखद घटनेबद्दल IIT बॉम्बेने तीव्र शोक व्यक्त केला आहे. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्याचे मित्र, वर्गमित्र, प्राध्यापक आणि इतरांना संस्थेकडून आवश्यक मदत व पाठबळ दिले जात असल्याचे IIT बॉम्बेने सांगितले.

हे ही वाचा -

Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना