मुंबई : पत्नीसोबत गावाला येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात घडली आहे. मनिषा यादव असे मयत महिलेचे नाव असून धक्कादायक बाब म्हणजे हत्या करणारा तिचा पती शिवकुमार याने टिळकनगर पोलिसांना फोन करून या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवकुमार यादव या निर्दयी पतीला अटक केली आहे.


डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात हरी ओम म्हात्रे चाळीत शिवकुमार यादव हा आपली पत्नी मनीषा व दोन मुलासोबत राहत होता . शिवकुमारला आज पत्नीसोबत गावाला निघायचे होते त्यासाठी त्याने दोघांची तिकिटे काढली होती. त्यासाठी शिवकुमारने सकाळपासून आपली पत्नी मनीषाकडे गावाला जाण्यासाठी तगादा लावला. मात्र मनिषाने नकार देताच शिवकुमार यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शिवकुमार चाकूने मनीषा यांच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात मनीषाचा जागीच मृत्यू झाला.


ही घटना घडली तेव्हा त्यांचा मोठा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. तर 11 वर्षाचा मुलगा घरीच होता .आईला रक्ताच्या थोरोळ्यात पाहून हा मुलगा प्रचंड घाबरला होता. या घटनेनंतर शिवकुमार याने टिळक नगर पोलिसांना फोन करून आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शिवकुमार यांना ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान या घटनेमुळे डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.