Hingoli Crime News: हिंगोली जिल्हा पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोली पोलीस दलातील नियंत्रण कक्षात (Police Control Room) कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने (Police Sub-Inspector) धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आपले आयुष्य संपवले. अमोल गंगलवाड (50) असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. खाकी वर्दीमध्येच पोलीस अधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हिंगोली पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
Hingoli Crime News: धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरातील खटकाळी बायपास (Khatkali Bypass) परिसरातील रेल्वे रुळावर हा प्रकार घडला. पूर्णा येथून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रेनची अमोल गंगलवाड वाट पाहत उभे होते. रेल्वे जवळ येताच त्यांनी अचानक धावत्या ट्रेनसमोर उडी घेतली. या घटनेत गंभीर दुखापत झाल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
Hingoli Crime News: वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने तात्काळ हिंगोली रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांना याविषयी कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.
Hingoli Crime News: टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
अमोल गंगलवाड यांची दोन महिन्यांपूर्वीच परभणी पोलीस दलातून (Parbhani Police) हिंगोली पोलीस दलात बदली झाली होती. अत्यंत मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, त्यामुळे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
