गोंदिया : गेल्या काही दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडक कारवाई मोहिम राबविण्यात येत असून सरकारी अधिकारी, व कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका वाहतूक पोलीस शिपायावरही 50 रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. आता, खासगी इसमाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरून धावणार्‍या ट्रक चालकांकडून एंट्रीच्या नावावर 500 रुपयांची लाच (Bribe) स्वीकारणार्‍या नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकासह (RTO) तिघांना नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवरी तालुक्यातील शिरपूर येथील सीमा तपासणी नाक्यावर करण्यात आली. 

प्राप्त माहितीनुसार, योगेश गोविंद खैरनार (46) रा. रचना युथिका अपार्टमेंट, अमरावती रोड, नागपूर असे आरोपी मोटार वाहन निरीक्षकाचे तर नरेंद्र मोहनलाल गडपायले (63) रा. मरारटोली, गोंदिया, आश्लेश विनायक पाचपोर (45) रा. गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज समोर, गाडगे नगर, अमरावती असे आरोपींचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मालवाहतुकीचा ट्रेलर भंडारा देवरी मार्गे रायपूर कडे जात असताना आरटीओ सीमा तपासणी नाका, शिरपुर, देवरी येथे आरोपी नरेंद्र गडपायले याने एंट्रीच्या नावावर त्यांच्याकडे 500 रुपयांची मागणी करून आरोपी आश्लेष पाचपोर याचे मार्फत आरोपी मोटार निरीक्षक खैरनार याचेकडे दिले.

विशेष म्हणजे, पथकाकडून केलेल्या चौकशीत आरोपी नरेंद्र गडपायले व आश्लेष पाचपोर हे खासगी व्यक्ती असून आरोपी योगेश खैरनार यांनी दोघांनाही बेकायदेशीपणे शिरपूर, देवरी आरटीओ सीमा तपासणी नाका येथे नेमले असल्याचे व दोघांच्या मार्फत मुंबई-कोलकाता महामार्गाने जाणार्‍या मालवाहू वाहन चालकांकडून एंट्रीच्या नावाखाली लाच स्वीकारत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, पथकाने तिघांनाही ताब्यात घेत देवरी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मात्र, ही लाचखोरी उघड झाल्यामुळे पुन्हा एकदा आरटीओ कार्यालयात वरिष्ठांकडून बोगस नेमणूक करुन मलिदा खाण्याचा प्रकार घडत असल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

5 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात; परमेश्वर जाधवांना रंगेहाथ अटक