Gautami Patil Pune Accident news: पुण्यातील नवले पूलावर झालेल्या अपघात प्रकरणामुळे नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे. गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. या अपघाताच्यावेळी गौतमी पाटील (Gautami Patil) कारमध्ये नव्हती. मात्र, रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना (Pune Police) दिल्या होत्या. यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. त्यामुळे गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Pune Crime news)
पुणे पोलिसांनी या अपघात प्रकरणात गौतमी पाटील हिला शुक्रवारी नोटीस धाडली होती. त्यानंतर आता याप्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील हिची कार टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरुन नेण्यात आली. ही टोईंग व्हॅन कोणी आणली होती, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. त्यासाठी या परिसरातील सगळे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करताना चालढकल केली जात आहे, असा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे पुणे पोलिसांकडून सगळ्या तपासाची माहिती रिक्षाचालकाच्या मुलीला दिली जाणार आहे.
पुण्यातील नवले ब्रीजजवळ नेमकं काय घडलं, अपघातानंतर गौतमी पाटीलच्या कारचा ड्रायव्हर बदलला?
गौतमी पाटील हिला अटक करुन पोलीस ठाण्यात आणा, या मागणीसाठी शुक्रवारी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी रिक्षाचालकाच्या एका नातेवाईकाने सांगितले की, 30 सप्टेंबरला आमचा भाऊ पहाटे पाच वाजता 10 रुपये मिळवण्यासाठी पॅसेंजरची वाट पाहत उभा होता. त्याची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी मागून एक कार आली आणि त्याला ठोकून निघून गेली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा तीनवेळा पलटी आणि आमचा भाऊ जखमी होऊन रस्त्यावर पडला. या अपघातानंतर ज्या कारने धडक दिली, त्यामधील लोक खाली उतरले आणि निघून गेले. मात्र, अर्धा तासाने एक व्यक्ती पुन्हा आला आणि त्याने त्याच्यासोबत टोईंग व्हॅन आणली होती. टोईंग व्हॅनच्या क्रेनने गौतमी पाटीलची कार टो करुन घटनास्थळावरुन नेण्यात आली. मात्र, आमचा भाऊ जखमी अवस्थेत तसाच रस्त्यावर पडून होता. त्याच्याकडे कोणीही बघितले नाही. रिक्षावाल्यांनी वेळीच मदत केली म्हणून आमच्या भावाचा जीव वाचला, असा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला.
या अपघातानंतर पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार चालकाला अटक केली. मात्र, अपघाताच्यावेळी हा चालक नव्हता. वैद्यकीय तपासणीसाठी दुसऱ्याच कोणालातरी आयत्यावेळी ड्रायव्हर म्हणून साद करण्यात आले. पोलीस हायवेवरील कॅमेरे बंद असल्याचे सांगत आहेत. पुण्यासारख्या शहरात असे कसे होऊ शकते? ज्या कारमुळे अपघात झाला ती गौतमी पाटीलची होती. त्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
आणखी वाचा
गौतमी पाटीलला उचलायचं की नाही; चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन, म्हणाले...