Gadchiroli Paddy Scam: गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिव आणि केंद्रप्रमुखास धान घोटाळा (Paddy Scam) प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. किशोर पदा असे संस्था सचिवाचे, तर सुरेश पुंगाटी असे केंद्रप्रमुखाचे नाव आहे. संस्था अध्यक्ष सुधाकर पुंगाठी हे फरार आहेत. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम 2022-23 मध्ये खरेदी केलेल्या धान्यात 1.37 कोटी रुपये किमतीचे 13 हजार धानपोती कमी आढळली होती. या गैरव्यवहार प्रकरणी संस्थेच्या या तिघांसह मदतनीस प्रवीण दुर्गे, अहेरी येथील प्रभारी विपणन अधिकारी सोनाली पेंदाम या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणी तब्बल वर्षभरानंतर संस्था प्रमुख आणि सचिवाला अटक करण्यात आली असून संस्था अध्यक्ष फरार आहे. या घोटाळ्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे. 

वाघ-बिबट्याची शिकार करत कातडीसह अवयव विक्रीचा प्रयत्न, दोघांना अटक

वाघ आणि बिबट्याची शिकार करून कातडी आणि इतर अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील वनविभागाच्या चमुने केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील काही लोक शिकार व तस्करीत गुंतल्याची माहिती समोर आली होती. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ-बिबट्याच्या कातडीसह इतर अवयवांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच आधारे नकली ग्राहक पाठवून तीन आरोपींना 19 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघ आणि बिबट्याच्या मिशा, दोन दात, तसेच उदमांजराची कातडी आणि एक गावठी पिस्तुलही जप्त करण्यात आले होते. त्या आरोपींनी हे साहित्य मिळवण्यात कोरची तालुक्यातील आरोपींचा हात असल्याचे सांगितल्यानंतर सडक अर्जुनीच्या चमुने कोरची तालुक्यातील नकुल प्रल्हाद शहारे रा.कोहका आणि जितेंद्र गोविंदराव कराळे या दोघांना ताब्यात घेतले. 

यावेळी त्यांच्याकडून बिबट्याची कातडीही जप्त करण्यात आली आहे. यात आणखी तिघांचा समावेश असून त्याचा शोध सुरू आहे. दोघांना बेडगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

विषबाधेमुळे 15 शेळ्यांचा मृत्यू, रिसोड तालुक्यातील घटना

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शेतशिवारात विषबाधेमुळे 15 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारी काही शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या असता, हळदीच्या पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या फवारणीसाठी  वापरण्यात येणारे औषध टाकीतील विषारी पाणी प्यायल्याने त्यांना विषबाधा झाली. रासायनिक कीटकनाशकेच हे पाणी पिल्यामुळे 15 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेत काही शेळ्यांना देखील विषबाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शेळीपालकांच मोठं आर्थिक नुकसान झालंय.

इतर महत्वाच्या बातम्या