Extortion Case : मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयाने फरार असलेला गँगस्टर गुरु साटम (Guru Satam ) याच्या मुलाला आणि पुतण्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेसह त्यांना पाच लाख रूपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोघांना आणखी दोन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.  


गुरु साटम याने 2014 साली दादर येथील एका बिल्डरला दहा कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सुरू केला होता आणि त्याच वर्षी गुरू साटम यांचा पुतण्या नरहरी नारायण साटम याला पीआय राजू सुर्वे आणि त्यांच्या पथकाने 10 लाखांच्या वसूलीच्या रकमेसह रंगेहाथ अटक केली होती.


या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेने गुरू साटम याचा मुलगा भूषण साटम याला देखील अटक केली. त्यानंतर गुरु साटमचा निकटवर्तीय पुरणशंकर यालाही अटक केली. गेल्या 7 वर्षांपासून हे आरोपी तुरुंगात आहेत. याच प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून आज शिक्षा सुनावली आहे.


काय आहे प्रकरण?  


गुरु साटम याने दादर येथे राहणाऱ्या एका बिल्डरला धमकीचा फोन करून त्याच्याकडून 10 कोटींची खंडणी मागितली होती. खंडणीचा पहिला टप्पा म्हणून 10 लाख रूपये  घेण्यासाठी आलेल्या दोघांना खंडणी विरोधी सेलने रंगेहाथ अटक केली होती. अटक केलेल्या दोघांमध्ये एक गुरू साटम याचा पुतण्या नरहरी साटमचा समावेश होता. काही काळानंतर गुरू साटम याचा मुलगा भूषण साटम आणि गुरु साटमचा निकटवर्तीय पुरणशंकर यालाही अटक करण्यात आली होती. 


30 वर्षांपासू गुरु साटम फरार 
गेल्या 30 वर्षांपासून फरार असलेला गुंड गुरु साटम सध्या दक्षिण आफ्रिकेत असल्याची गुप्तचर विभागाला माहिती आहे. दरम्यान, 27 जानेवारी 2022 रोजी गुरु साटमविरोधात बिल्डरला खंडणी आणि फ्लॅटसाठी धमकी दिल्याबद्दल खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.