ठाणे : भाडेकरारनाम्याचा बनावट दस्तावेज करून त्या माध्यमातून रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानग्या मिळवून मूळ मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapitl Patil) यांचा पुतण्या सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्यासह इतर दोन इसमांविरोधात शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी पोलिसांना (Police) केलेल्या शिवीगाळ प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल असतानाच आता फसवणूक प्रकरणी त्यांचा पुतण्या सुमित पाटील (Sumit Patil) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने माजी मंत्री कपिल पाटील यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. आधी खासदारकी गेली, मंत्रीपदही गेलं. आता पुतण्यावरही गुन्हा दाखल झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
            
सुमित पुरुषोत्तम पाटील वय 40 वर्ष,सुरेंद्र काशिनाथ पाटील वय 35 वर्ष व देवेंद्र काशिनाथ पाटील वय 30 वर्ष असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनीही आपसात संगणमत करून व्यावसायिक अक्षय राजेंद्र जैन वय 63 रा. मुंबई यांच्या धामणकर नाका येथे असलेल्या जागेवर त्यांनी बांधलेल्या गाळ्यांवर व जमिनीवर 1 ऑगस्ट 2023 पूर्वी सुमित पाटील याने कब्जा करून याठिकाणी नव्याने सुरु केलेल्या रसोई मल्टीक्युझीन रेस्टोरंट या हॉटेलच्या दुकानाशी कोणताही संबंध नसतांना सुरेंद्र पाटील याच्या सोबत देवेन्द्र पाटील यास साक्षीदार ठेवून नोटरी करून या दुकानाचा कब्जा घेतला होता. 


या नोटरीवरून भाडे कारारनाम्याचा बनावट दस्तावेज तयार करून अक्षय जैन यांच्या मालमत्तेच्या पत्त्यावर जीएसटी परवाना, फूड लायसन्स,आरोग्य दाखला,अग्निशमन परवाना,पोलीस लायसन्स,गुमास्ता लेबर,शॉप अँड एस्टॅब्लिशमेन्ट लायसन्स परवाना लाबाडीने मिळवून सुमित,सुरेंद्र व देवेन्द्र या तिघांनीही आपसात संगनमत करून अक्षय जैन यांची फसवणूक केली आहे.याप्रकरणी जैन यांनी शहर पोलीस ठाण्यात सुमित पाटीलसह सुरेंद्र व देवेन्द्र या तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार करीत आहेत. 


हेही वाचा


पोलिस बंदोबस्तात शिवरायांची वाघनखं साताऱ्यात, स्वागताला उदयनराजे; 'या' 4 शहरांत ठेवणार