भिवंडी : दीड तोळ्यांच्या सोनसाखळीसाठी 14 वर्षीय मुलाची हत्या ही घटना ताजी असतानाच खानावळीसाठी घरी येणाऱ्या कामगाराचे मुलाच्या आईशी अनैतिक संबंध असल्याने आठ वर्षाच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीत घडली आहे.
भिवंडी तालुक्यातील कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरील राहणाऱ्या एका कुटुंबाचा 8 वर्षाचा मुलगा हा दुपारपासून बेपत्ता झाल्याने परीसरात शोधूनही त्याचा शोध न लागल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्या नुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला असता त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक बंद खोलीत आढळून आला होता. भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता त्या परिसरातील संशयित जितेंद्र मधेशिया यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबुल केले.
आरोपी जितेंद्र हा हत्या केलेल्या कुटुंबाकडे खानावळ लावून जेवण करण्यासाठी येत होता. त्यावेळी तो हत्या झालेल्या मुलाच्या आईसोबत शारिरीक लगट करीत असल्याबाबत मुलाने आपल्या वडिलांना गोष्ट सांगितल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याची खानावळ बंद केली. मुलाने आपले कारस्थान सांगितल्याने आपले बिंग फुटले याचा राग मनात ठेवून जितेंद्र याने आठ वर्षीय चिमुरड्यास खेळण्याच्या बहाण्याने बोलवून आपल्या सोबत चौथ्या मजल्यावर घेऊन गेला व त्या ठिकाणी त्याची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चिमुरड्याची हत्या करणारा जितेंद्र मधेशिया यास अवघ्या अठरा तासात अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता आरोपीस 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.