Satara Crime News :सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी अखेर मुंबईत उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या तथाकथित पीएने दिलेली धमकी आणि त्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठांकडून सुरू झालेली चौकशी, या सर्व त्रासाला कंटाळून डॉ. रुपनवर यांनी त्यांचं जीवन संपवल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर आरोग्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. लीला मदने यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संपदा मुंडे यांच्यानंतर राज्यातील आणखी एका निष्ठावान डॉक्टरने तणावातून जीवन संपवल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Phaltan Fitness Certificate Dispute : फिटनेस सर्टिफिकेटवरून झाला होता वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मागील जुलै महिन्यात प्रसाद कोंडे देशमुख नामक व्यक्ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी आला होता. तो स्वतः माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करत होता. वेळेची मर्यादा संपलेली असतानाही त्याने तात्काळ सर्टिफिकेट देण्याचा तगादा लावला. मात्र, डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी नियमांचे बोट धरत तातडीने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. त्यानंतर वरिष्ठांनी हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला फिटनेस सर्टिफिकेट दिले.
Prasad Konde Deshmukh Threat Case : सोशल मीडियावर सुसाईड नोट
या वादानंतर प्रसाद कोंडे देशमुख याने डॉ. रुपनवर यांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या डॉ. रुपनवर यांनी हातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. या प्रकरणाची तातडीने दखल घेत फलटण शहर पोलिसांनी डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीवरून प्रसाद कोंडे देशमुख याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
Dr Leela Madane Enquiry Committee : चौकशी समितीचा अहवाल आणि मुंबईतील व्हिडीओ
मात्र, या घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. लीला मदने यांनी डॉ. रुपनवर यांच्याविरोधातच चौकशी समिती गठीत केली. या चौकशी समितीचा अहवाल बराच काळ प्रलंबित ठेवण्यात आला. डॉ. रुपनवर यांनी वारंवार मागणी करूनही त्यांना अहवाल दिला गेला नाही. या मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. रुपनवर यांनी मुंबई गाठली. तेथे त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करत डॉ. लीला मदने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आणि कारवाई न झाल्यास जीवन संपवण्याचा इशारा दिला.
Satara Doctor Suicide Incident : उपचारादरम्यान मृत्यू, डॉ. लीला मदने निलंबित
व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर काही वेळातच डॉ. रुपनवर यांनी त्यांचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई करत वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. लीला मदने यांना सेवेतून निलंबित केले आहे.
ही बातमी वाचा:
