ठाणे: साधूची वेशभूषा करून 75 वर्षीय वृद्ध इसमाला तुमचे कष्ट दूर करतो असे सांगत बोलण्यात गुंतवले आणि त्याची सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन पसार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन भामट्यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल मदारी, आशिष मदारी ,लखन निकम अशी या तीन भामट्यांचे नावे आहेत. डोंबिवली पूर्वेतील खोली पलावा या ठिकाणी ही घटना घडली होती.
पोलिसांनी या आरोपींकडून सोन्याची चेन आणि गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांनी अशाप्रकारे आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय मानपाडा पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील खोली पलावा येथे राहणारे माधव जोशी हे भाजी घेऊन बुधवारी सकाळच्या सुमारास घराकडे परतत होते. याच वेळेस एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून तिघे जण आले. यामधील दोघे साधूच्या वेशभूषेत होते. त्यामधील एकाने साधू असल्याची बतावणी करून जोशी यांना थांबवले. तुमचे कष्ट दूर करतो असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले.
हातचलाखीने चेन आणि अंगठी काढून घेतली
आरोपींनी हाचलाखीने जोशी यांच्या गळ्यातली चेन आणि हातातली अंगठी काढून घेतली. जोशी यांना काही समजण्याच्या आतच हे भामटे पसार झाले. या प्रकरणी माधव जोशी यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. डीसीपी अतुल झेंडे, एसीपी सुहास हेमाडे , वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादवाने ,पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांच्या पथकाने या भामट्यांचा शोध सुरू केला.
सीसीटीव्हीच्या आधारे माग काढला
मानपाडा पोलिसांनी तात्काळ आजूबाजूच्या परिसरातल्या सीसीटीव्ही तपासले. गाडीचा नंबर निष्पन्न करून त्याआधारे गाडीचा शोध सुरू केला. हे तिघे भामटे हे भिवंडी येथील कोन या गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ कोनगाव परिसरात सापळा रचत या तिघांनाही अटक केली. राहुल मदारी, आशिष मदारी, लखन निकम अशी या तिघांची नावे आहेत.
राहुल मदारी आणि आशिष मदारी हे मूळचे गुजरात येथील रहिवासी आहेत. राहुल मदारीने साधूची वेशभूषा केली होती तर लखन निकम हा गाडी चालवत होता. आशिष हा साधूचा शिष्य असल्याचे बतावणी करायचा. राहुल मदारी विरोधात याआधी देखील अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची नोंद आहे.या तिघांनी अशाप्रकारे अनेक नागरिकांना लुबाडल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून पोलिस पुढील तपास करत आहेत.