डोंबिवली : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील कुंभार खान पाडा येथे एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. मित्राच्या घरात बलात्कार झाल्यानंतर ती त्यांच्या तावडीतून घराबाहेर पडल्यानंतर दुसऱ्या मित्राने तिचा पाठलाग करत जबरदस्तीने रिक्षामध्ये कोंबून बलात्कार केल्याची घटना घडली.
पीडित महिला आणि तिचा पती मित्राच्या घरी कपडे आणण्यासाठी गेले होते. तेव्हा मित्राने पीडित महिलेच्या पतीला दारू आणण्यासाठी पाठवले आणि महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी दोघांपैकी एक आरोपी दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर दिनेशचा साथीदार सुनिल राठोड याचा शोध पोलीस घेत आहेत.
पतीला दारू आणण्यासाठी पाठवले आणि...
डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात पिडीत महिला राहते. पीडित दाम्पत्य राहते घर सोडण्याच्या तयारी होते. या जोडप्याने आपले घरगुती सामान त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी पिडीत महिला आणि तिचा पती हे त्यांचे सामान आणण्यासाठी गेले होते. या दोघांच्या ओळखीचे दिनेश गडारी आणि सुनिल राठोड हे दोघे घरी होते. या दोघांनी पिडीत महिलेच्या पतीला दारु आणण्याकरता सांगितले. तिचा पती दारू आणण्यासाठी निघून गेला. तरुणी एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर बलात्कार केला. ती कशीबशी घराबाहेर निघाली आणि पळू लागली.
पाठलाग करून रिक्षात बलात्कार केला
तिचा पाठलाग करुन दिनेश गडारी याचा मित्र सुनील राठोड याने तिला एका रिक्षात कोंबले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला मदतीची याचना करत होती. मात्र सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल. पीडित महिलेचा पती दारू घेऊन मित्राच्या घरी परतला तेव्हा तिने पतीला तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली.
आरोपींना कायद्याची भीती राहिली नाही. त्यांनी पतीसमोरच पीडितेवर अश्लील चाळे केले. पीडित महिलेच्या पतीला मारहाण करत त्याला देखील एका घरामध्ये डांबून ठेवण्यात आले. ही घटना झाल्याच्या नंतर आरोपींनी या दोघांना पोलीस स्टेशनला किंवा कुठे वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी देत तिथून पिटाळून लावले. मात्र कसेबसे पीडित कुटुंब डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस स्टेशनला पोहोचले आणि या घटनेची हकीकत पोलिसांना सांगितली.
दरम्यान, विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल राठोड अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.