ठाणे : राज्यात गॅस पुरवठ्यावरुन गोंधळाची स्थिती असताना त्याचा फायदा आता सायबर ठग उचलत असून त्यांच्याकडून सर्वसामान्यांनाची फसवणूक होत असल्याचं समोर येत आहे. डोंबिवलीत सायबर गुन्हेगारांनी (Dombivli Cyber Crime) ‘महानगर गॅसचे कनेक्शन बंद होणार’ असे सांगत एका कापड व्यापाऱ्याची तब्बल 14 लाख 46 हजार 989 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अरुण भगवान मोरे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून ते डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरात कुटुंबासह राहतात. मोरे हे कपड्यांच्या विक्रीसह पेंटिंग व चायनीज पदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात.
Dombivli Gas Connection Scam : ‘12 रुपये पाठवा’ म्हणत फसवणूक
अरुण मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःला महानगर गॅस कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. त्याने परिसरात नवीन गॅस लाईन टाकण्यात येणार असून सध्याचे कनेक्शन बंद होणार असल्याचं सांगितलं. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून 12 रुपये पाठवा, असा बहाणा करण्यात आला.
त्यावर अरुण मोरे यांना संशय आल्याने त्यांनी कोणतीही बँक माहिती दिली नाही. तसेच त्या व्यक्तीला पुन्हा संपर्क करू नका, अन्यथा पोलिसांत तक्रार करीन, अशी तंबीही दिली.
Dombivli Cyber Crime : आठ व्यवहारांत खात्यातून 14.46 लाख लंपास
मात्र त्यानंतर अरुण मोरे यांना रात्रीच्या सुमारास मोबाईलवर बँक खात्यातून पैसे काढल्याचे संदेश येऊ लागले. वेगवेगळ्या आठ व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून 14 लाख 46 हजार 989 रुपये काढून घेण्यात आल्याचं समोर आलं. आपण कोणताही व्यवहार केला नसतानाही इतकी मोठी रक्कम खात्यातून वळती झाल्याने मोरे यांना मोठा धक्का बसला.
Dombivli E-Challan Scam : दोन महिलांनाही 4 लाखांचा गंडा
दरम्यान, डोंबिवलीतच सायबर गुन्हेगारांनी दोन महिलांना ‘ई-चलन’ आणि APK लिंक पाठवून जवळपास 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. ही लिंक उघडताच मोबाईलमधील माहिती हॅक करून आरोपींनी त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेतल्याचे समोर आले आहे.
Police Action On Gas Scam : दोन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
या प्रकरणी रामनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने अनोळखी फोन कॉल, लिंक किंवा अॅप डाउनलोड करण्यापूर्वी नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा:
