Dombivli Crime News : डोंबिवलीत एका उच्च शिक्षित इंजिनियरने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. रॉबिन आरुजा असं या इंजिनिअरचं नाव असून त्याच्यासह किरण बनसोडे, रॉकी कर्न, नवीन सिंग आणि आलोक यादव या साथीदारांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ही टोळी बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने सीम कार्ड मिळवायची, त्या सीमकार्डच्या सहाय्याने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमधून महागडय़ा वस्तू मागवायचे. मागविलेल्या वस्तू आणणाऱ्या पार्सल बॉयला बतावणी करुन त्याने आणलेल्या पार्सलमधून वस्तू काढून घेत त्यात त्याच वजनाची दुसरी वस्तू टाकून परत करायचे. काही मिनटात ते काम करत होते. या पाच जणांच्या टोळीनं देशभरातील अनेक राज्यात या दोन कंपन्यांना गंडा घातला आहे. अखेर या टोळीस डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक करुन मोठी कामगिरी केली आहे.
डोंबिवली पलावा या हायप्रोफाइल सोसायटीमध्ये राहणारा रॉबिन आरूजा हा उच्चशिक्षित इंजिनियर आहे. झटपट पैसे कमविण्याच्या नादात त्याने फसवणूक करण्याचा मार्ग अवलंबला. यासाठी त्याने आणखी चार जणांची निवड केली होती. त्याच्या टोळीत सिम कार्ड विक्रेता देखील होता. ही पाच जणांची टोळी अमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीला गंडा घालण्याचा काम करत होते.
बनावट आधारकार्ड तयार करून आधी सिम कार्ड मिळवायचे ,या सिम कार्डचा आधारे अमेझॉन फ्लिपकार्ट या कंपनीकडून मोबाईल व इतर महागड्या वस्तू ऑर्डर करायचे त्या वस्तू घेऊन डिलिव्हरी बॉय आल्यानंतर त्याच्याकडून काही ना काही बहाणा करून तो बॉक्स घ्यायचे. त्याची नजर चुकवून अवघ्या काही क्षणात बॉक्स कटरच्या साह्याने कापून त्यातील वस्तू काढून त्याऐवजी त्याच वजनाच्या दुसऱ्या वस्तू ठेवायचे. पैसे कमी असल्याचा बहाणा करत तो बॉक्स पुन्हा कंपनीला पाठवून द्यायचे. त्यानंतर या वस्तू त्या बाजारात कमी किमतीत विक्री करत होते.
याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफिने या प्रकरणाचा तपास करत या टोळीला जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 22 मोबाईल, एक लॅपटॉप, एक आयपॅड, एक टॅब, वीस सिम कार्ड , 29 बनावट आधारकार्ड असा पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाच जणांनी गुजरात, पश्चिम बंगाल राज्यातील विविध शहरात तसेच महाराष्ट्रातील पुणे ,मुंबई ,सातारा ,ठाणे ,अलिबाग या शहरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. यापूर्वी देखील त्यांना कराड ,अलिबाग, कासारवडवली या पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गुन्हे केल्याबद्दल अटक केल्याची माहिती समोर आली आहे.