महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपी तरुणाने विवाहितेच्या पतीला तिचे फोटो पाठवले. याप्रकरणी महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कुणाल शिंगाडे याला अटक केली आहे.

ठाणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. याउलट गेल्या काही महिन्यात या घटनांमध्ये वाढ झाली असून महिलांना व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देतही बुवा, महाराजांनीही अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच, आता डोंबिवलीत (Dombivali) मैत्रीचा फायदा घेत विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर तिचे तब्बल 70 हून अधिक व्हिडिओ काढल्याचा आरोप पीडितेने केला आहे. विवाहितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी तरुणाने विवाहितेच्या पतीला तिचे फोटो पाठवले. याप्रकरणी महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कुणाल शिंगाडे याला अटक केली आहे. डोंबिवलीतील शिरढोण परिसरात राहणाऱ्या कुणाल शिंगाडे याची संबंधित विवाहितेशी मैत्री होती. या मैत्रीचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले. काही काळानंतर विवाहितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपीने महिलेच्या पतीला तिचे फोटो पाठवले.
दरम्यान, आरोपीकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाच्या या प्रकाराला कंटाळून महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कुणाल शिंगाडे याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
धुळ्यात 27 महिलेवर सामूहिक अत्याचार
धुळ्यात 27 वर्षीय विवाहित महिलेवरील कथित सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर चर्मकार समाज आक्रमक झाला आहे. नटराज सिनेमा परिसरातील रामदेवबाबा नगर, चर्मकार वाडा येथील या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत सकल चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करून खटला विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी करण्यात आली. दाखल गुन्ह्यातील सर्व कलमांचा सखोल तपास करून आरोपींना कायदेशीर सवलत मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणा साठी सक्षम विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाला पूर्ण सुरक्षा द्यावी, आवश्यक कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल आणि सकल चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आली.
हेही वाचा





















