दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मुंबई उच्च न्यायालयात सतिश सालिन यांनी याचिका दाखल केली होती, या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने दिशा सालियानचे वडील सतिश सालियान यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha saliyan) मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार, आज दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतिश सालियान यांचा जबाब सीबीआयकडून (CBI) नोंदवण्यात आला आहे. जवळपास चार तासांनंतर सतिश सालियान सीबीआयच्या कार्यालयातून पडले बाहेर असून लवकरच गुन्हा दाखल होईल, अशी माहिती सतिश सालियन याचे वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुंबई उच्च न्यायालयात सतिश सालिन यांनी याचिका दाखल केली होती, या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने दिशा सालियानचे वडील सतिश सालियान यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी, सारे रेकॉर्ड सीबीआयकडे हॅन्डओव्हर करण्याचेही निर्देश देण्यात आले असून मालवणी पोलिसांनी तपासाचे सर्व तपशील सीबीआयला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिल्याची माहिती दिशा सालियनच्या वकिलांनी दिली. आदित्य ठाकरे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद कोर्टाने फोटाळल्यामुळे आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सुरू झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने उप अधिक्षक पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
सतिश सालियान यांनी जबाब नोंदवला
कोर्टाच्या आदेशानुसार जबाब नोंदवण्यात आला आहे, तो जबाब एफआयआरला जोडला जाईल. दोन दिवसात सीबीआयच्या संकेतस्थळावर एफआयआर उपलब्ध होईल. आता, कोणाच्या हातात काही नाही, जबाब नोंदवा आणि गुन्हा दाखल करा असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. सुशांत आणि दिशा या दोघांच्या केसेस एकमेकांशी निगडित आहेत, त्यात रिया चक्रवर्तीची मोठी भूमिका आहे, असे नितीन ओझा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. सचिन वाझेचं एक्सट्रा जुडेशन कन्फेशन आमच्याकडे आहे, सतिश सालियान यांच्या म्हणण्यानुसारच जबाब नोंदविण्यात आला आहे. आरोपींची नावं मी दिलेली आहेत, त्यानुसार जबाब नोंदविण्यात आला. जवळपास चार तास जबाब नोंदवण्याची प्रक्रिया चालली, अशीही माहिती ओझा यांनी दिली.
मी सीबीआयकडे माझा जबाब नोंदवला असून आरोपींची नावे दिली आहेत, त्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणीही केल्याचं दिशाचे वडिल सतिश यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.
दिशाचा जून 2020 मध्ये मृत्यू
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता, त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र, तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असंही रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. खरंतर, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दिशा सालियन मृ्त्यू प्रकरणाची प्रचंड चर्चा होऊ लागली.
हेही वाचा
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप





















