मुंबई : सेलिब्रेटींची मॅनेजर असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. के जैन यांनी मोठी माहिती दिली आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांसह इतर नावांचा उल्लेख असला तरी त्याबाबत कोणताही पुरावा दिला नाही. तसेच एखाद्याविरोधात जोपर्यंत पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत कुणालाही आरोपी म्हणता येणार नाही, असंही ते म्हणाले.
मुंबईतील मालाड इथे 8 जून 2020 रोजी एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, म्हणजेच 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याचं जीवन संपवलं होतं. आता सीबीआयनं एफआयआर दाखल केल्याने याप्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरवर प्रतिक्रिया देताना माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. के जैन म्हणाले की, "एफआयआरमध्ये कोणतेही स्पष्ट तथ्य नाहीत. तसेच जोवर तपासात कोणाविरोधात काही समोर येत नाही तोपर्यंत कुणालाही आरोपी म्हणून ट्रीट करू नये असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
सीबीआयच्या एफआयआरमध्ये दिशाच्या बॉयफ्रेंडसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे नाव आहे. मात्र त्यांनी कोणतीही घटना किंवा स्पष्ट असा पुरावा दिलेला नाही. त्यांनी केवळ संशय व्यक्त केले आहेत. कोणतीही स्पष्ट माहिती नसताना कोणालाही आरोपी बनवणे हे त्यांच्यावरही अन्यायकारक होईल, असं मत पी. के जैन यांनी व्यक्त केलं.
"कुणालाही क्लीनचीट नाही"
असं असलं तरी ही कोणालाही दिलेली क्लीनचीट नाही. पुरावा समोर आल्यानंतर संबंधित लोकांना आरोपी करण्यात येईल. जसजसा तपास पुढे जाईल तशा गोष्टी स्पष्ट होतील. दिशाच्या वडिलांनी अनेक संशय व्यक्त केले आहेत. आता त्याची पडताळणी सीबीआयला करावी लागेल, असं पी. के जैन म्हणाले.
एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांना सीबीआयकडून समन्स बजावला जाऊ शकतो आणि जबाब नोंदवले जातील असं पी. के जैन म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात अजूनही काहीतरी सापडू शकते, मात्र सीबीआयला सखोल तपास करावा लागेल आणि ते एक मोठं आव्हान असेल, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
ही बातमी वाचा:
