पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णाल (Deenanath Mangeshkar Hospital and Research Center) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षीय प्रियदर्शनी बागडे हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Continues below advertisement

प्रियदर्शनीला डोळ्यात तिरळेपणाचा त्रास असल्याने उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 मे रोजी प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी काचबिंदूची शक्यता व्यक्त करत डोळ्याच्या मागील पडद्याची सखोल तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार 14 मे रोजी भूलतज्ज्ञांकडून तपासणी आणि रक्तचाचण्या करण्यात आल्या. सर्व अहवाल सामान्य असल्याचं सांगून 18 मे रोजी शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आलं.

Pune Eye Surgery Death : ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक प्रकृती बिघडली

सोमवारी सकाळी प्रियदर्शनीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी ती पूर्णपणे व्यवस्थित होती. मात्र डोळ्यात औषधी ड्रॉप टाकल्यानंतर अचानक तिला रक्ताची उलटी सुरू झाली. काही वेळाने डॉक्टरांनी मुलीच्या तोंडातून रक्त येत असल्याचं आणि हृदयाचे ठोके बंद पडल्याचं सांगितलं.

Continues below advertisement

Medical Negligence Allegation : पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

कुटुंबीयांचा आरोप आहे की, पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मुलीला तातडीनं अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. त्यानंतर ‘सीपीआर देत आहोत’ असे सांगण्यात आलं, मात्र काही वेळातच मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर प्रकरण दडपण्यासाठी आर्थिक आमिष दाखवण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Police Complaint : अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ससून रुग्णालयाने पोलीस तक्रारीशिवाय शवविच्छेदनासाठी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. प्रियदर्शनीच्या वडिलांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची लेखी तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात दिली आहे.

Dinanath Mangeshkar Hospital Statement : रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी सुरू

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व संबंधित कागदपत्रं आणि माहिती पोलिस तसेच ससून रुग्णालय (Sassoon Hospital) प्रशासनाला देण्यात येत असल्याचं रुग्णालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखले जाईल, असेही प्रशासनाने सांगितले.

ही बातमी वाचा: