धुळे:जिल्ह्यातील (Dhule) शिरपूर जवळील गिधाडे तापी नदी (River) पुलावरून उडी घेऊन एका 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने तापी पुलावरून एक भावनिक व गंभीर आरोप करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. संदीप उदेसिंग गिरासे (28), रा. अहिल्यापूर, शिरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने नदीत उडी घेतली होती. आज सकाळी त्याचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शिरपूर शहर पोलीस (Police) ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.

Continues below advertisement

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संदीपने आपण काम करत असलेल्या टेक्सटाईल पार्क कंपनीत आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले आहे. कंपनीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोन मुलींनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणानंतर कंपनीच्या मालकांनी आणि प्रशासनाने त्याला कामावरून काढून टाकले होते. कंपनीत परप्रांतीय लोकांना वाचवले जाऊ शकते, मात्र महाराष्ट्राच्या स्थानिक तरुणाला न्याय दिला जात नाही, अशी उद्विग्न भावनाही संदीपने व्हिडिओत मांडली होती. 

तापी पुलावर संदीपचा मोबाईल, मोटरसायकल आणि चप्पल पोलिसांना आढळून आली होती. दोन दिवस स्थानिक प्रशासन आणि पट्टीचे पोहणारे नदीपात्रात त्याचा शोध घेत होते अखेर आज त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संदीपच्या मृत्यूची बातमी समजताच अहिल्यापूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. जोपर्यंत आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या संशयितांना तात्काळ अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी लावून धरली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Continues below advertisement

हेही वाचा

पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल