Shakul Company Scam : वित्तीय फर्ममध्ये पैसे गुंतवले तर आकर्षक व्याजदर मिळेल अशी बतावणी करून दोंडाईचातील अनेक गुंतवणूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फर्मच्या माध्यमातून काही जणांनी गंडा घातल्याची रक्कम तब्बल दीड कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून फर्मच्या संचालकांसह कलेक्शन करणाऱ्या दोन एजंटवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम तब्बल 76 कोटी रुपये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यातून निव्वळ 56 कोटी रुपये हे धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची रक्कम असून गुन्ह्याच्या तक्रारीत तब्बल 1 कोटी 40 लाख 50 हजार 508 रुपयांची गुंतवणुकीची फसवणूक झाल्याच्या प्राथमिक तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
या फसवणूकदारांकडून गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी चार कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या कंपन्यांच्या नावाखाली त्यांच्याकडून गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमीश दाखविण्यात येत होते. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता, धुळे जिल्ह्यातील दोघांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने मुसक्या आवळण्यात आल्या. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने पुढील तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणात धुळे जळगाव आणि नंदुरबारमधील गुंतवणूकदारांना तब्बल 56 कोटी रुपयांपर्यंतचा गंडा घालण्यात आला असून विशेष म्हणजे यात साडेचार हजाराहून अधिक शिक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी दोंडाईचा येथील मंगेश नारायण पाटील आणि आकाश मंगेश पाटील या दोघा संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनी सुरत येथील प्रदीप शुक्ला, धनंजय बराड, देवेश तिवारी, संदीप कुमार, मनुभाई पटेल यांच्यासोबत शकुल वेल्थ ॲडव्हायझरी, शकुल वेल्थ क्रियेटर, आणि फाउंडर डेलिगेट या फर्म सुरू केल्या होत्या. या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा नऊ टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखविण्यात आले होते. मात्र काही महिने परतावा दिल्यानंतर यातून एक कोटी चाळीस लाख पन्नास हजार पाचशे आठ रुपयांची फसणूक झाल्याची तक्रार दोंडाईचा येथील राणीपुरा परिसरात राहणाऱ्या रवींद्र नेरकर यांनी केली. त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कंपनीचे काम कसे चालायचे?
सुरत येथील प्रदीप शुक्ला धनंजय बराड, देवेश तिवारी, संदीप कुमार मनुभाई पटेल आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रहिवासी असणारे मंगेश नारायण पाटील आणि आकाश मंगेश पाटील यांनी शुकुल ग्रुप ऑफ कंपनीज या कंपनीची सुरुवात सन 2019 मध्ये केली होती. विशेष म्हणजे या कंपनीचे कार्यालय गुजरात राज्यातील सुरतमध्येच सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात याचे कार्यालय सुरू करण्यात आले नव्हते. या संशयतांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी कंपनीची जाहिरात करून या फॉर्ममध्ये पैसे गुंतवल्यास प्रति महिना आठ ते नऊ टक्के दराने आकर्षक परतावे मिळतील. असे आकर्षक आणि लोभस अमिषे दाखवून गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित केले. गुंतवणूकदारांकडून ऑनलाईन द्वारे कंपनीच्या बँक खात्यात पैसे स्वीकारून त्यांच्या गुंतवणुकी संदर्भात लॉक युनिट इन्शुरन्सचे पत्र देऊन त्यांना आश्वासित करण्यात आले होते. मात्र त्याचा कुठलाही पूर्ण मोबदला अथवा परतावा न देता त्यांची मुद्दल रक्कम सुद्धा परत करण्यास टाळाटाळ केल्याने आणि आर्थिक शोषण केल्याने सदरचा प्रकार समोर आला आहे.
कोण आहेत आरोपी?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रहिवासी असणारे मंगेश नारायण पाटील आणि आकाश मंगेश पाटील हे पिता पुत्र महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रहिवासी आहेत. त्यांनी कंपनीच्या विविध पैसे गुंतवणुकीचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली आहे. अशा कंपनीच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होण्याची धुळे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून या संशयतांनी याआधी देखील अशा कोणत्या प्रकारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे का याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहे.