Dhule Crime: मुलीच्या लग्नाचा आनंद क्षणात विरला; बायकोसमोर अपमान झाल्याने पोटच्या मुलानेच आई-वडिलांना मुसळाने संपवलं; धुळ्यात खळबळ
Dhule Crime: एका पोटच्या मुलानेच आपल्या आई आणि वडिलांचा जीव घेतल्याची घटना शिरपूर येथील महावीर सोसायटीमध्ये घडली आहे. यामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

Dhule Crime: धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका पोटच्या मुलानेच आपल्या आई आणि वडिलांचा जीव घेतल्याची घटना शिरपूर येथील महावीर सोसायटीमध्ये घडली आहे. "बायकोसमोर अपमानास्पद बोलले," याच गोष्टीचा राग मनात धरून नराधम मुलाने आई-वडिलांच्या डोक्यात मुसळने जबर प्रहार केले. या हल्ल्यात दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत आई-वडील आपल्या मुलीचे लग्न आटोपून शुक्रवारी दुपारी घरी परतले होते. घरात लग्नाचा आनंद आणि गडबड असतानाच, कौटुंबिक कारणावरून वाद उफाळून आला. आरोपी मुलगा चंदन इंदाराम महतो याला त्याचे आई-वडील पत्नीसमोर काहीतरी अपमानास्पद बोलले. पत्नीसमोर झालेल्या या अपमानाचा राग चंदनच्या एवढा डोक्यात गेला की, त्याने घरातील मुसळ उचलली आणि थेट आई-वडिलांवर हल्ला चढवला.
Dhule Crime: आई-वडिलांचा जागीच मृत्यू
आरोपी चंदन याने आई रांजुदेवी महतो आणि वडील इंदाराम महतो यांच्या डोक्यात मुसळने एकामागून एक सपासप प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भयानक कृत्यानंतर आरोपी मुलगा चंदन महतो घटनास्थळावरून पळून जाण्याच्या (फरार होण्याच्या) तयारीत होता. मात्र, घरातून येणारा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने तिथे धाव घेतली. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पळून जाणाऱ्या चंदनला जागीच पकडून ठेवले आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
Dhule Crime: चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही
पोटच्या मुलानेच आई-वडिलांचा जीव घेतल्याने शिरपूर परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या आई-वडिलांनी जन्माला घातले, वाढवले त्यांची हत्या केल्यानंतरही आरोपी चंदन महतो याच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप किंवा दुःख दिसून येत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. शिरपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Before You Go
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!






















