Dhule Crime: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) आणि सोलापूरच्या 'मनोहर मामा'च्या  (Manohar Mama) भोंदूगिरीच्या घटना ताज्या असतानाच, आता धुळे (Dhule) जिल्ह्यातून अंधश्रद्धेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातील जैताणे येथे एका भोंदूबाबाने शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी आलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Dhule Crime: रस्त्याच्या कडेला आढळला तरुणीचा मृतदेह

जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय 25) आणि अक्षय गंगाधर सोनवणे अशी मृत्यू झालेल्या दोघा मित्र-मैत्रिणींची नावे आहेत. मृत जयश्री ही एका फायनान्स कंपनीत काम करत होती, तर अक्षय हा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता. तसेच त्याचा वडिलोपार्जित केबलचा व्यवसाय देखील होता.

शनिवारी सकाळी साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव रस्त्यावरील टेंबे फाट्याजवळ एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले होते आणि तिच्या मृतदेहावर एक दुचाकी टाकून देण्यात आली होती, जेणेकरून हा अपघाताचा प्रकार वाटावा. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. निजामपूर पोलिसांनी तात्काळ पथकासह घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तपासात हा मृतदेह जयश्री काकुस्ते हिचा असल्याचे निष्पन्न झाले.

Dhule Crime: ...अन् 'त्या' एका केसरी रुमालाने फुटले भोंदूचे बिंग!

घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना एक केसरी रंगाचा रुमाल आढळून आला. हा रुमाल या संपूर्ण तपासात सर्वात महत्त्वाचा दुवा ठरला. पोलीस श्वान पथकाला (Dog Squad) हा रुमाल सुंघवण्यात आला असता, श्वानाने माग काढत थेट भोंदूबाबा योगेश ऊर्फ भैय्या बापू खैरनार (रा. जैताणे) याच्या मठाचा रस्ता दाखवला. पोलिसांनी संशयावरून तात्काळ या भोंदूबाबाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Dhule Crime: पूजाविधीदरम्यान झाला होता वाद 

जयश्रीचे काका संजय हिरे यांनी निजामपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आणि प्राथमिक तपासातील माहितीनुसार, जयश्री आणि अक्षय हे दोघे शनी अमावस्येच्या रात्री विशेष पूजेसाठी भोंदू बाबा योगेश खैरनार याच्या आश्रमात गेले होते. तेथे पूजाविधी सुरू असताना त्यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला. यानंतर भोंदू बाबाने संतप्त होऊन अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्याला संपवले. तर जयश्रीचा ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला.

Dhule Crime: भोंदू बाबाचा बनाव आणि मृतदेहाची विल्हेवाट

अटक टाळण्यासाठी या भोंदू बाबाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा एक अजब बनाव रचला होता. जयश्रीला दुसराच एक जण मारत होता, मी तिला वाचवायला गेलो आणि त्या झटापटीत माझ्या हातून त्या तरुणाचा जीव घेतला गेला, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसी चौकशीत हा खोटा पाढा टिकला नाही. त्याने अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळ उभांरडी येथील वनक्षेत्रात (शिवारात) नेऊन पुरल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह वाहून नेण्यासाठी त्याने बैलगाडीचा वापर केला होता, ज्याच्या चाकांचे निशाण जमिनीवर आढळून आले आहेत. पोलिसांनी तात्काळ उंबरांडी शिवारातून अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी भोंदू बाबा योगेश खैरनार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.

आणखी वाचा 

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात