Dharashiv Crime News: उमरगा (Umarga) शहर बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका 35 वर्षीय इसमाची धारदार हत्याराने तसेच दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास करत उमरगा पोलिसांनी (Police) अवघ्या 12 तासांत हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शाहूराज महादू सूर्यवंशी (वय 35) असे मृत इसमाचे नाव आहे.
Dharashiv Crime News: मृतदेह आढळल्याने खळबळ
रविवारी सकाळी कोरेगाववाडी रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. काही नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह पडताच त्यांनी तात्काळ उमरगा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाचा चेहरा विद्रूप करण्यात आल्याने मृताची ओळख पटवणे कठीण झाले होते.
Dharashiv Crime News: चार तासांच्या प्रयत्नानंतर मृताची पटली ओळख
उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे तपासाची सूत्रे हलवली. शेजारील शेतकरी, स्थानिक नागरिक यांच्याशी संपर्क साधून सखोल चौकशी करण्यात आली. अखेर तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर मृताची ओळख शाहूराज सूर्यवंशी अशी पटवण्यात पोलिसांना यश आले.
Dharashiv Crime News: श्वान पथक, फॉरेन्सिक टीमकडून पाहणी
हत्या करणाऱ्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले, तर फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपास केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी मेघना नागराज यांनीही घटनास्थळाला भेट देत तपासाची पाहणी केली.
Dharashiv Crime News: तांत्रिक तपासातून आरोपी उघड
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स व इतर तांत्रिक पुराव्यांचा सखोल अभ्यास केला. या तपासातून शिवाजी दत्तू दूधनाळे (वय 32) आणि मृताची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी (वय 34) यांचा सहभाग स्पष्ट झाला. दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
Dharashiv Crime News: अनैतिक संबंधातूनच हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शाहूराजची पत्नी गौरी आणि आरोपी शिवाजी यांच्यात अनैतिक संबंध होते. या कारणावरून शाहूराज आणि गौरी यांच्यात वारंवार वाद होत होते. आपल्या संबंधांत शाहूराज अडथळा ठरत असल्याने गौरी आणि शिवाजी यांनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
Dharashiv Crime News: दारू पाजून निर्घृण हत्या
रविवारी पहाटे आरोपी शिवाजीने शाहूराजला दारू पाजली. त्यानंतर रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्याला उमरगा बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यावर नेण्यात आले. तेथे शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला जमिनीवर पाडण्यात आले. त्यानंतर आरोपी शिवाजीने हंटर आणि दगडाने त्याच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. या मारहाणीत शाहूराज सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा