धाराशिव : राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मारहाण होत असल्याचे प्रकार सातत्यानं समोर येत आहेत. आता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वाल्हा येथील एका  व्यक्तीनं शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या माणसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाणानीनंतर रत्नदीप चव्हाण रुग्णालयात दाखल असून त्यांनी या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे दाद मागितली आहे. अंजली दमानिया यांनी आमदार तानाजी सावंत यांना इशारा दिला आहे. 


काय घडलं? 


धाराशिवच्या भूम तालुक्यातील वाल्हा येथे तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्याकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.  तानाजी सावंत यांच्या 14 ते 15 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा रत्नदीप चव्हाण या व्यक्तीनं आरोप केला आहे.  मारहाणी नंतर रत्नदीप चव्हाण या व्यक्तीला उपचारासाठी धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या आधीही अनेक वेळा खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.  


काल सकाळीच भूम तालुक्यातील दुधोडी गावातील माऊली गिरी या तरुणाचा मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यांनतर वाल्हा येथे मारहाणीची आणखी एक घटना घडल्याने भूम परंडा तालुक्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते. 


पीडित रत्नदीप चव्हाण काय म्हणाला? 


शिंदे गटाचे लोक, तानाजी सावंतांचे लोक आले आणि त्यांनी मारहाण चालू केली. कुणी सोडवण्यास आली तर त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. फायटर, वायररोप होत्या. माझा भाऊ सोडण्यासाठी आला होता तर त्याला मारहाण करण्यात आली. आदल्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी या लोकांनी येऊन मारहाण केली, असं रत्नदीप चव्हाण म्हणाले.


मारहाण झालेल्या रत्नदीप चव्हाण यानं काही जणांची नाव घेतली आहेत. निलेश शेळवणे, कृषी सभापती, बालाजी शेळवणे, राम उर्फ गणपत पवार , अतुल नारायण शेळवणे, राहुल नारायण शेळवणे यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, ही नावं रत्नदीप चव्हाण यांनी घेतली आहेत.


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रत्नदीप चव्हाण यानं व्हाटसअपवर पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉट पोस्ट करुन आमदार  तानाजी सावंत यांना इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या "आमदार तानाजी सावंत. ह्या रत्नदीप चव्हाणांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. बंद करा आता दादागिरी आणि दहशत." अंजली दमानिया यांच्या इशाऱ्यानंतर तानाजी सावंत काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.






इतर बातम्या :


आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल