Viral Video : धक्कादायक! ज्येष्ठ नागरिकाला पकडलं, मारलं आणि लुटलं; गुन्हेगार अद्याप मोकाट
दिल्लीच्या जहांगिरपुरीमध्ये पहाटे साडेतीन वाजता एका ज्येष्ठ नागरिकाला दोन युवकांनी लुटल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. ही घटना घडली त्या ठिकाणाहून पोलीस स्टेशन केवळ 200 मीटर अंतरावर आहे.
नवी दिल्ली : वायव्य दिल्लीच्या जहांगिरपुरी परिसरात पहाटे साडेतीन वाजता एका 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला दोन युवकांनी मारहाण करत त्याच्याकडील बॅग चोरी केल्याची घटना घडली आहे. ही लुटमारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यात किंवा त्यांची ओळख पटवण्यात अद्याप पोलिसांना यश आलं नाही.
राम निवास हे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक पहाटे साडेतीनच्या सुमारास आपल्या घरी परतत होते. त्यांच्या मागून दोन युवक आले आणि एकाने मागून त्यांचा गळा पकडला. दुसऱ्या युवकाने राम निवास यांच्या हातातली बॅग काढून घेण्याचा प्रयत्न केला. राम निवास यांनी आपल्या हातातली बॅग न सोडल्याने त्या युवकाने त्यांचा पाय ओढला आणि त्यांना रस्त्यावर आपटलं. शेवटी त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील बॅग काढून घेण्यात आली आणि चोरट्यांनी पलायन केलं.
#JUSTIN: Two men robbed a bag from a 65-year-old man when he was returning home in North-West Delhi’s Jahangirpuri area. An FIR has been registered, but no arrest has been made so far. @IndianExpress, @ieDelhi pic.twitter.com/coK4mARdBt
— Mahender Singh Manral (@mahendermanral) August 27, 2021
त्यानंतर स्वत:ला सावरत राम निवास यांनी आपलं घर गाठलं आणि घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप तरी कोणालाही अटक करण्यात आली नाही.
महत्वाचं म्हणजे ही घटना घडली त्या ठिकाणाहून जहांगिरपुरी पोलीस स्टेशन केवळ 200 मीटर अंतरावर होतं. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नाही आणि दिल्लीतील ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहिले नाहीत हे यावरुन स्पष्ठ झालं आहे.
दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. एकीकडे रात्री आठ वाजल्यानंतर महिला आणि मुलींना दिल्लीच्या रस्त्यावरुन मोकळं फिरता येत नाही तर दुसरीकडे आता एकट्या-दुकट्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांच्या लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
संबंधित बातम्या :