Honeytrap : काही शत्रू देश हनी ट्रॅपचा वापर करून इतर देशाच्या सैनिकांना लक्ष्य करत आहेत. या माध्यमातून ते सुरक्षा यंत्रणेशी संबंधित माहिती काढण्यात ते यशस्वी होतात. सध्या अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांना यश मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI ) हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 


भारतीय हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप


मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा असे आरोपीचे नाव आहे. देवेंद्र शर्मा यांना आधी हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून भारतीय हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा केल्याचा आरोप आहे. देवेंद्र शर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे व पत्ते विचारण्यासोबतच आणखी इतरही महत्वाची माहिती काढण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात देशाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या गुप्तचर संस्थेच्या इनपुटवरून दिल्ली पोलिसांनी आरोपी देवेंद्र शर्माला 6 मे रोजी अटक केली आहे.


फेसबुकवर एका महिलेच्या प्रोफाईलवरून मैत्री


गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्माला धौला कुआन येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांसर शर्मा हा कानपूरचा रहिवासी आहे. त्याची फेसबुकवर एका महिलेच्या प्रोफाईलवरून मैत्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर फोनच्या माध्यमातून देवेंद्र शर्माला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISA हात असल्याचा संशय


ती महिला ज्या क्रमांकावरून देवेंद्र शर्मा यांच्याशी बोलायची, तो क्रमांक भारतीय सर्व्हिस प्रोव्हायडरचा आहे. सध्या पोलीस महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, या प्रकरणात आणखी मदत होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहारही आढळून आले आहेत.