Dadar Suitcase Case : दादर स्टेशन (Dadar Station) परिसरातील सुटकेसमधील मृतदेहाचं प्रकरण उलगडलं आहे. पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. दोन्ही आरोपी आणि मृतक तिघेही मूकबधीर असल्याची माहिती समोर आली आहे. पण, अद्याप या प्रकरणातील व्हिडीओ कॉलचं गूढ मात्र उलगडलेलं नाही.
कुर्ल्यातील मूकबधिर अर्शद अली सादिक अली शेख याची हत्या करण्यात आली. मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या स्थानकावर एका सूटकेसमध्ये त्याचा मृतदेह कोंबून भरला होता. याच प्रकरणाचा खुलासा झाला असला तरीसुद्धा अनेक गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे. मूकबधिर अर्शदची हत्या त्याची पत्नी रुक्सानानंच केल्याचं समोर आलं आहे. पायधुनी पोलिसांनी बुधवारी रात्री रुक्सानाला अटक केली. पण, या प्रकरणातील परदेशातील व्हिडीओ कॉल आणि अन्य व्यक्तींचा संबंध काय? याबाबत मात्र, अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
हत्येनंतर व्हिडीओ कॉल कुणाला?
दादर सुटकेस हत्या प्रकरणात दिवसागणिक अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात अर्शदची हत्या केल्यानंतर आरोपींनी एकमेकांना व्हिडीओ कॉल केले होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे अर्शद, शिवजीत जयच्या घरी दारू पार्टीसाठी जमले होते. त्याचवेळी जय आणि शिवजीतनं अर्शदच्या हत्येचा कट तडीस नेला. त्यानंतर जयनं एका तरुणीसह इतर दोघांना व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलवर शिवजीतनं अर्शदची हत्या केली, असं दाखवलं. त्यानंतर शिवजीतनं एकाला "काम हो गया", असा इशारा दिला. त्यानंतर पुढे याच व्यक्तीनं हत्येचा लाईव्ह व्हिडीओ मुंबईसह इतर शहरांमधील मूक बधिरांसाठी असलेल्या टीव्ही डिफ व्हिडीओज या ग्रुपवर शेअर केले.
शिवजीतनं व्हिडीओ कॉलवरुन ज्याला काम हो गया, असा इशारा दिला, ती व्यक्ती दुबईतली असल्याची माहिती अर्शदच्या नातेवाईकांनी दिली. व्यक्ती दुबईत असून सर्व सूत्र हलवत असल्याचे नातेवाइकाचे म्हणणं आहे. बेल्जियमच्या मोबाईल क्रमांकावरून 7 मिनिटांचा व्हिडीओ कॉल सुरू असल्याचंही समोर आलं आहे. या व्यक्त्तीचं या प्रकरणाशी नेमकं काय कनेक्शन आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
नेमकं घडलंय काय?
2012 मध्ये अर्शदचा रुक्सानासोबत प्रेमविवाह झाला. अर्शद आणि रुक्सानाला दोन मुलं आहेत. अर्शद छोटी-मोठी कामं करुन कुटुंबीयांचा उदर्निवाह करायचा. पायधुनीमधील गुलालवाडी परिसरात कोट्यवधींच्या घरात राहणारा जय चावडा आणि शिवजीत सिंह यांच्यासोबत क्रिकेट खेळायला जायचा. कालांतराना तिघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर जय चावडाच्या फ्लॅटमध्ये दारू पार्ट्या सुरू झाल्या. जय चावडा मुंबईतील अंधेरी भागात एका लॅबमध्ये अॅनिमेशनचं काम करायचा. त्याच्या घरात तो एकटाच राहायचा. त्याची आई आणि भाऊ कॅनडात वास्तव्याला होते.
जयच्या घरात कुणीच नसल्यामुळे अर्शद आणि शिवजीत त्याच्याकडेच असायचे. पुढे दर रविवारी तिघेही घरात एकत्र दारू पार्ट्या करायचे. रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले होते. नेहमीप्रमाणे त्यांची दारू पार्टी सुरू होती. त्याच वेळी जय आणि शिवजीतनं अर्शदचा काटा काढायचं ठरवलं. दोघांनीही त्याच्या हत्येचा कट आखला आणि तो तडीस नेला. ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी झालाही. पण, पोलिसांनी अखेर याप्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
जयकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
आरोपी जयनं पोलिसांना दिलेल्या जबाबात खोटी माहिती दिली. शिवजीतचे अर्शदच्या बायकोसोबत वाद सुरू असल्याचं सांगितलं. त्यातूनच शिवजीतनं हत्या करुन मला धमकावलं आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितली, अशी खोटी माहिती पोलिसांना दिली.